लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, पृथ्वीतलावावर त्या जुळून येतात आणि पुढे कधी टिकतात तर कधी सुटतात, असे म्हटले जाते. बॉलीवूडमधील काही जोडय़ांच्या या ऋणानुबंधाच्या गाठी अद्यापही घट्ट असून त्या सुटलेल्या नाहीत. ‘नांदा सौख्यभरे’ म्हणत यापैकी काही जोडय़ा ३५ ते ४० वर्षांहून अधिक काळ संसार करत आहेत. यातील सगळ्यात जुनी जोडी दिलीपकुमार व सायराबानू यांची असून त्यांच्या लग्नाला ४८ वर्षे झाली आहेत.
बॉलीवूडच्या मायावी आणि झगमगाटी क्षेत्रात जोडय़ा जमतात आणि त्यांचे लग्नही होते. मात्र हे लग्न किती काळ टिकेल याचा काहीच भरवसा नसतो. या जोडय़ा लग्नाच्या बेडीत अडकतात पण काही दिवसांत, महिन्यांत किंवा वर्षांत फुटतातही. आता तर काही जोडय़ा ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्येही राहतात. मात्र याच बॉलीवूडमधील काही जोडय़ा अशा आहेत की त्यांच्या लग्नाला चाळीसहून अधिक वर्षे झाली आहेत आणि त्यांचा संसार सुरू आहे.
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार आणि सायराबानू यांच्या लग्नाला ४८ वर्षे झाली असून बॉलीवूडमधील इतकी वर्षे लग्न टिकून असलेली सध्याची ही ‘हिट’ जोडी म्हणता येईल. त्या खालोखाल अमिताभ आणि जया यांची जोडी असून त्यांच्या लग्नाला ४१ वर्षे झाली आहेत. लग्नानंतर जया बच्चन यांनी काम बंद केले. अमिताभ बच्चन यांच्या ‘अफेअर्स’ बाबत जाहीर चर्चा होत असूनही हे लग्न टिकून राहिले. जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या लग्नालाही तीस वर्षे झाली आहेत. जावेद यांचे पहिले लग्न झालेले होते. त्यामुळे शबाना यांच्या कुटुंबीयांकडून या लग्नाला विरोध होता. पण शबाना आझमी ठाम राहिल्याने या दोघांनी लग्न केले.
रुपेरी पडद्यावरील ‘ड्रिम गर्ल’ हेमामालिनी आणि ‘ही मॅन’ धर्मेंद्र यांच्या लग्नालाही ३३ वर्षे झाली आहेत. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न झालेले आहे, हे हेमामालिनी यांना माहिती होते, तरी दोघांच्या ऋणानुबंधाच्या गाठी जुळल्या आणि इतक्या वर्षांनंतरही त्या टिकून आहेत. बॉलीवूडमधील ऋषी कपूर आणि नीतू सिंग ही जोडीही लोकप्रिय आहे. त्यांच्या लग्नाला ३४ वर्षे झाली.
बॉलीवूडमधील अन्य जोडय़ा
शाहरुख खान आणि गौरी-लग्नाला २३ वर्षे.
बोनी कपूर व श्रीदेवी- लग्नाला १८ वर्षे.
अजय देवगण आणि काजोल- लग्नाला १५ वर्षे.
अरबाज खान व मलाईका- लग्नाला १७ वर्षे.
अर्जुन रामपाल व मेहेर जेलिया- लग्नाला १६ वर्षे.
मराठीतील नांदा सोख्यभरे
बॉलीवूडच्या तुलनेत मराठी चित्रपटसृष्टीत अशा जोडय़ा तुलनेत कमी असल्या तरी त्यांचे ‘नांदा सौख्यभरे’ दीर्घकाळ टिकलेले आहे. यात रमेश देव आणि सीमा यांची जोडी सगळ्यात ‘हिट’ म्हणता येईल. बाळ धुरी व जयश्री गडकर, सचिन पिळगावकर व सुप्रिया, अशोक सराफ व निवेदिता जोशी, संजय मोने व सुकन्या कुलकर्णी या मराठीतील अन्य काही लोकप्रिय जोडय़ा आहेत