बाबरी मशीद वाद मिटल्यानंतर आता देशात काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद वाद शिगेला पोहोचला आहे. वाराणसीतील न्यायालयाच्या आदेशानुसार काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम नुकतंच पूर्ण झाले. या ज्ञानवापी मशिदीतील सर्वेक्षणानंतर हा वाद आणखी चिघळला आहे. हे प्रकरण ताजे असतानाच अभिनेत्री कंगना रणौत ही वाराणसीमध्ये दाखल झाली आहे. सध्या ती तिच्या आगामी धाकड या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यावेळी तिने या प्रकरणी भाष्य केले.

अभिनेत्री कंगना रणौतचा धाकड चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने तिने वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्या ठिकाणी पूजा केली. यावेळी कंगनाला वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीत ज्या ठिकाणी कथित शिवलिंगाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ती काशीतील प्रत्येक कणाकणात महादेव आहेत, असे तिने म्हटले आहे.

“ज्या प्रकारे मथुरेच्या प्रत्येक कणात भगवान श्रीकृष्ण आहे. जसे अयोध्येच्या प्रत्येक कणात श्री राम आहेत. त्याचप्रमाणे काशीच्या प्रत्येक कणात महादेव आहे. त्यांना कोणत्याही रचनेची आवश्यकता नाही. ते कणाकणात आहेत”, असे कंगना म्हणाली. त्यासोबत कंगनाने हर हर महादेव अशी घोषणाही यावेळी दिली. कंगनाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

‘धाकड’ या चित्रपटात कंगना रणौत ‘एजंट अग्नी’ची भूमिका साकारत आहे. जी एक प्रशिक्षित आणि आपल्या कामात अतिशय चोख असणारी एजंट आहे. या चित्रपटात तिने बरेच अॅक्शन सीन केले आहेत. या चित्रपटासाठी कंगनानं ३ महिन्यांचं विशेष प्रशिक्षण घेतलं होतं.

या चित्रपटात अर्जुन रामपाल खलनायकाच्या भूमिकेत असून तो एक आंतरराष्ट्रीय ह्यूमन आणि आर्म ट्राफिकर आहे. १० वर्षांपासून रडारवर असलेल्या रुद्रवीरशी कंगना दोन हात करताना दिसणार आहे. कंगना रणौत आणि अर्जुन रामपाल यांच्यासोबतच या चित्रपटात दिव्या दत्ताचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कंगना रणौतचा हा चित्रपट येत्या २० मे ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडून कंगनाला बऱ्याच अपेक्षा आहेत.

Story img Loader