काही संकल्पना खूप अभिनव असतात, सुंदर असतात. कित्येकदा रोजच्या जगण्याचा भाग असूनही त्याला आपण विचारस्पर्श करत नाही. त्यामुळे अशा एखाद्या समस्येवर नव्याने काही विचार मांडला जात असेल तर त्याविषयी आपली उत्कंठा वाढत जाते. मात्र एखादा नवा विचार-संकल्पना मांडताना ती वरवरच्या उत्साहाने मांडली आणि गाभ्यापर्यंत नेलंच नाही तर उगीचच नव्या वाटेवर येऊन हरवल्यासारखी आपली स्थिती होते. ‘लॉस्ट अ्रॅण्ड फाऊंड’ पाहताना आपल्याला छान गाणी, छान कलाकार, छान कॅमेरा आणि त्याच्या जोडीला एक वेगळी कल्पनाही दिसते पण त्या कल्पनेचे बोट फिरून त्यांच्याबरोबर जाताना आपण अध्र्यावर जाऊन हरवतो, तिथल्या तिथेच फिरत राहतो.
एकटेपणा हा किती गंभीर विषय असू शकतो, याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे. ऋतुराज धालगडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अॅण्ड फाऊंड’ या चित्रपटात एकटं राहणाऱ्यांच्या समस्यांना हात घातला आहे. आत्ताच्या काळात ब्रेकअपपासून ते मुलं परदेशात शिकायला गेली आहेत, आईवडील कामावर असतात. या आणि अशा अनेक कारणांमुळे आबालवृद्धांना एकटं राहण्याशिवाय पर्याय नसतो. परिस्थितीमुळे आलेला हा एकटेपणा झेलताना कित्येकांची धांदल उडते. तासन्तास रिकाम्या मनाने बसलेल्यांना अनेक मानसिक आजार जडतात. अशा वेळी मनात येणाऱ्या आणि साचून राहिलेल्या अगदी काहीबाही गोष्टीही ऐकण्यासाठी कोणी तरी हक्काचा कान हवा असतो. जेव्हा तो मिळत नाही तेव्हा त्या भेदरलेल्या मनांची परिस्थिती अवघड होऊन बसते. चित्रपटाचा नायक मानस (सिद्धार्थ चांदेकर) प्रेमभंग झाल्यामुळे नव्याने आलेला एकटेपणा झेलतो आहे. प्रेमात असताना ज्या व्यक्तीबरोबर अखंड सहवासात राहण्याची सवय असते तीच व्यक्ती सोडून जाते तेव्हा येणारं रिकामपण क सं दूर करणार? जुनं विसरून सहज नव्याच्या शोधात फिरणं कित्येकांना सहन होत नाही. जे मानसलाही मान्य नाही. त्यामुळे तो अजूनही त्याच गोष्टीत अडकून पडला आहे. आपल्याच एकटेपणात हरवलेल्या मानसला आजूबाजूच्या लोकांचा एकटेपणा जाणवायला लागतो. लोकांचा हा एकटेपणा घालवण्यासाठी मानस श्रीरंगकाका (मोहन आगाशे) आणि मारुती (मंगेश देसाई) यांच्या मदतीने ‘एएलपी’ (अॅण्टी लोन्लीनेस प्रोग्रॅम) आखतो. कॉलनीतल्याच मुलांना घेऊन सुरू झालेल्या या कार्यक्रमात नैनाही (स्पृहा जोशी) सहभागी होते. एकटेपणा घालवण्यासाठी अशा लोकांना प्रत्यक्ष भेटून, त्यांच्या समस्या ऐकायच्या, त्यांना त्यांच्या दु:खापासून दूर न्यायचं, त्यांना हसवायचं या विचाराने ही मंडळी एकत्र येतात, हा या चित्रपटातला नवा विचार आहे. खरं म्हणजे याच एकटेपणा घालवण्यासाठीच्या उपाययोजनांचा एक मोठा विकृत ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींचा बाजार बोकाळला असताना केवळ सामाजिक कार्याच्या उद्देशाने अशी चळवळ उभी करणे ही कल्पना म्हणून नक्कीच चांगली आहे पण ती मांडताना त्याची व्यवहार्यता तर्काच्या कसोटीवर पाहणे गरजेचे वाटते. जे दुर्दैवाने या चित्रपटात दिसत नाही.
एकटय़ा लोकांना एकेक दिवस भेटून त्यांच्या समस्या दूर करायच्या तर अशा लोकांच्या घरात प्रवेश करण्यापासूनच अनेक अडचणीच्या प्रश्नांचा डोंगर उभा राहतो. मुळात अशा प्रकारे काम करायचे असेल तर रोजच्या रोज नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांना ते शक्य आहे का, हा खरा प्रश्न आहे. चित्रपटात मानस, नैना दोघेही आपापला नोकरी-धंदा करताना दिसतात. त्यांनी सुट्टीचा वार दिला हे जरी गृहीत धरले तरी अशा प्रकारे वैयक्तिकरीत्या तडजोडी करून उभे राहणारे काम तितकेच मर्यादित राहते. प्रत्येक एकटय़ा माणसाच्या शारीरिक, मानसिक समस्या वेगवेगळ्या असतात, त्याचा काहीएक अभ्यास न करता त्यांना उत्तरं शोधून देणं कितपत बरोबर आहे. चित्रपटात श्रीरंगकाका वडिलांपासून दूर राहणाऱ्या मुलाला काहीएक उपदेश करून एकत्र आणताना दिसतात. काकांचा अनुभव ही गोष्ट एकवेळ मान्य केली. तरीही बॉयफ्रेंडच्या मागे लागणाऱ्या आणि प्रेम म्हणजे काय याची अक्कलही नसलेल्या एका कुमारवयीन मुलीच्या घरात तिचे आईवडील नसताना तिची समजूत काढण्याचा मानस आणि नैनाचा प्रयत्न किती योग्यतेचा आहे? यासाठी ‘एएलपी’त सहभागी होणाऱ्यांना काहीएक प्रशिक्षण देणे, मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे नाही का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. चित्रपटाच्या पूर्वार्धात फक्त ‘एएलपी’भोवती फिरणारी कथा उत्तरार्धात मानस आणि नैनाच्या प्रेमकथेवर येऊन संपते, हेही पटत नाही. शुभंकर शेंबेकर या संगीतकाराने संगीत दिलेली ‘तू साद दे’, ‘आस ही नवी’ अशी गाणी क थेच्या तरलतेनुसार श्रवणीय आहेत. एकूणच कलाकारांचा सहजाभिनय, गाणी, नवेपण चित्रपट पाहताना ‘फील गुड’ अनुभव मिळत असला तरी कथाविचार मात्र हरवून बसतो.
लॉस्ट अॅण्ड फाऊंड
दिग्दर्शक– ऋतुराज धालगडे
कलाकार– सिद्धार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, मोहन आगाशे, मंगेश देसाई
संगीत– शुभंकर शेंबेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा