कमल हसनचा हा बिग बजेट, भव्य चित्रपट आहे. अमेरिका, अफगाणिस्तान येथे मोठय़ा प्रमाणावर चित्रीकरण असलेल्या या चित्रपटातून दहशतवाद्यांचे अड्डे, दहशतवादी कारवाया कशा घडवायच्या, बॉम्ब कसे बनवायचे, मानवी बॉम्बचे प्रशिक्षण कसे द्यायचे हे प्रभावी पद्धतीने दाखविले आहे; परंतु फ्लॅशबॅक आणि वर्तमान, वर्तमान आणि पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये चित्रपटाचे कथानक घडत असल्यामुळे प्रेक्षकांचा गोंधळ उडतो. उत्तम अॅक्शनपट असलेला हा चित्रपट अंतिमत: प्रेक्षकांवर कोणताही अपेक्षित परिणाम न करता संपतो. उरतात ती फक्त विश्वनाथ ऊर्फ विसाम ऊर्फ विझ अर्थात कमल हसनची अनेक रूपं. वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हा चित्रपट असल्यामुळे त्याची भरपूर चर्चा रंगली असली तरी वाद निर्थक आहे, हे हा चित्रपट अधोरेखित करतो.
विश्वनाथ हा न्यूयॉर्कमध्ये कथ्थक नृत्यशाळा चालवितो. त्याची बायको डॉ. निरुपमा ही दहशतवादी ओमरचा साथीदार असलेल्या दीपकच्या कंपनीत न्यूक्लिअर ऑन्कॉलॉजी या विषयात संशोधनाचे काम करतेय. ग्रीन कार्ड हवे म्हणून ती विश्वनाथसोबत लग्न करते, पण नंतर तिचा बॉस आणि अब्जाधीश असलेल्या दीपकच्या प्रेमात पडते. नवऱ्याला म्हणजे विश्वनाथ (कमल हसन) याला घटस्फोट देण्यासाठी डॉ. निरुपमा (पूजा कुमार) कारण शोधतेय. विश्वनाथविरोधात काही ठोस कारण सापडले, तर घटस्फोट घेता येईल या विचाराने ती खासगी गुप्तहेर विश्वनाथच्या पाठी लावते. खासगी गुप्तहेर दीपक आणि ओमर यांच्याकडूनच मारला जातो. त्याचे धागेदोरे विश्वनाथ, दीपक आणि डॉ. निरुपमा यांच्यापर्यंत जाऊन पोहोचतात आणि ओमरची माणसं तिघांना पकडतात. दीपकला मारून टाकतात आणि आपण काय भलत्याच लफडय़ात अडकलो असे डॉ. निरुपमाला वाटते. आता आपल्यालाही मारणार असे तिला वाटत असतानाच अनपेक्षितरीत्या नृत्यकार, भित्रा असलेला विश्वनाथ अचानक रूप बदलतो आणि त्याला पकडणाऱ्या टोळीच्या सर्वाना मारून टाकतो. मग सुरू होतो फ्लॅशबॅक. काही वर्षांपूर्वी रॉ संस्थेचा गुप्तहेर म्हणून विश्वनाथ ऊर्फ वासिमने अल-कायदा संघटनेच्या अफगाणिस्तानातील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रात प्रवेश केलेला असतो. छोटी छोटी माहिती काढून ओमर (राहुल बोस) सोबत राहून, त्याचा विश्वास संपादून अल-कायदाची खडान्खडा माहिती तो काढतो. सीसीयमद्वारे न्यूयॉर्क शहर उडवून देण्याचा दहशतवाद्यांनी रचलेला कट उधळून लावण्यासाठी वर्तमानात तो प्रयत्न करत असतो आणि अचानक डॉ. निरुपमाचा खासगी गुप्तहेर मारला गेल्याने चक्रव्यूहात अडकतो. दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करण्यात रॉ आणि एफबीआयचा एजंट असलेला विश्वनाथ यशस्वी होतो किंवा नाही याभोवती चित्रपटाचे कथानक फिरत राहते.
वारंवार फ्लॅशबॅकमध्ये चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकांचा गोंधळ उडतो. निर्मिती-दिग्दर्शन-लेखन-अभिनय-गीतलेखन अशी अनेक रूपं आणि विश्वनाथ ऊर्फ वसीम ऊर्फ विझ अशी आणखी दोन रूपं अशा अनेक रूपांत कमल हसन पडद्याला व्यापून उरतो. रॉचा एजंट आणि दहशतवाद्यांच्या घरात राहून हेरगिरी करणारा विश्वनाथ हा मुळात कथ्थक शिकविणारा नर्तक कसा काय असू शकतो हा प्रश्न प्रेक्षकाला पडतो, परंतु तद्दन गल्लाभरू चित्रपट पाहताना असे प्रश्न विचारू नयेत म्हणूनच कमल हसन प्रेक्षकांना विश्वनाथची अनेक रूपं दाखवितो.
राहुल बोसने साकारलेला दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओमर आणि कमल हसन यांचा अभिनय वगळला, तर बाकी कलावंतांना विशेष कामच नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिका प्रभावी ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शेखर कपूरसारखा ज्येष्ठ दिग्दर्शक पाहुणा कलावंत म्हणून वावरला आहे. रॉ संस्थेचा अधिकारी असलेल्या शेखर कपूरला कथानकामध्ये वावच नाही. त्याच्याऐवजी कुणालाही घेतले असते तरी काहीच फरक पडला नसता. विशेष म्हणजे शेखर कपूर या नगण्य भूमिकेत काम करायला तयार कसा झाला, असा प्रश्नही प्रेक्षकाला नक्कीच पडतो; परंतु ‘सब कुछ कमल हसन’ असलेल्या या चित्रपटाबाबत असे प्रश्न गैरलागू ठरावेत.
अफगाणिस्तानचे चित्रण आणि दहशतवादी प्रशिक्षण केंद्राच्या चित्रणातून दहशतवादी कसे राहतात, कसे प्रशिक्षण देतात, किती निर्दयी असतात वगैरे प्रभावीपणे दाखविण्यात दिग्दर्शकाच्या रूपातील कमल हसन यशस्वी ठरला आहे; परंतु फ्लॅशबॅकचे तंत्र वारंवार वापरल्याने प्रेक्षक मात्र कंटाळतात. चित्रपटाच्या शेवटी ओमर पलायन करण्यात यशस्वी होतो; परंतु तो जिवंत राहिला म्हणजे त्याच्याशी लढण्यासाठी आपल्याला आणखी एक रूप घ्यावे लागेल, असे विश्वनाथ सांगतो आणि याद्वारे सीक्वेलपटाचे सूतोवाच करीत चित्रपट संपतो. प्रेक्षकासमोर चित्रपट संपल्यानंतर उरतात ती फक्त अशी कमल हसनची वेगवेगळी रूपं!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा