गिरीश जोशी लिखित-दिग्दर्शित ‘लव्हबर्ड्स’ हे सस्पेन्स थ्रिलर नाटक नुकतंच तिसऱ्यांदा रंगभूमीवर आले आहे. एखादं नाटक पुनरुज्जीवित होण्यामागे विवक्षित कारणं असतात. उदाहरणार्थ ‘घाशीराम कोतवाल’, ‘वाडा चिरेबंदी’, ‘महानिर्वाण’, ‘नटसम्राट’, ‘हमिदाबाईची कोठी’सारखी नाटकं त्यांतील अभिजात मूल्यांमुळे
गिरीश जोशी यांचं ‘लव्हबर्ड्स’ हे सस्पेन्स थ्रिलर नाटक सादरीकरणाच्या दृष्टीने आव्हानात्मक असल्याने त्याची भूल पुन: पुन्हा दस्तुरखुद्द लेखक (व दिग्दर्शकही!) आणि कलावंतांनाही पडत असावी. म्हणूनच नुकतंच तिसऱ्यांदा ते रंगभूमीवर आलं आहे. मुक्ता बर्वेसारख्या ताकदीच्या अभिनेत्रीला ते करावंसं वाटावं, यातच त्याची यत्ता दडली आहे. ‘लव्हबर्ड्स’ची ही तिसरी आवृत्ती आधीच्या दोन आवृत्तींचा विचार करता सर्वोत्तम उतरली आहे. संहितेतील नाटय़पूर्ण वळणंवाकणं, अनपेक्षित पेच, शह-काटशह, परिस्थितीजन्य चक्रव्यूह यांची अशी काही अप्रतिम गुंफण त्यात आहे, की मराठीतल्या सस्पेन्स थ्रिलर नाटकांतून मेंदूला झिणझिण्या आणणारा आणि शेवटापर्यंत टिकणारा असा थरार सहसा आढळत नाही.
‘लव्हबर्ड्स’चा कथांश असा : देविका इनामदार या उच्चभ्रू स्त्रीचा नवरा (विश्वास) एका जीवघेण्या कार अपघातात कसाबसा वाचतो खरा; परंतु त्यात त्याचा सबंध चेहरा विरूप होतो. अपघातात त्याची पूर्वस्मृतीही संपूर्णपणे नष्ट होते. अर्थात् एका यशस्वी अॅड एजन्सीचा मालक असलेल्या विश्वासकडे पैशांची ददात नसल्यानं प्लास्टिक सर्जरी करून त्याला नवा चेहरा बहाल केला जातो. मात्र, त्याची पूर्वस्मृती नष्ट झाल्याने त्याला आता मागचं काहीही आठवत नाही. विश्वासला त्याचा भूतकाळ, त्याच्या अवतीभोवतीची माणसं, त्यांच्याशी असलेले त्यांचे नातेसंबंध, त्याचं पूर्वीचं व्यक्तिमत्त्व असं सगळंच नव्याने अवगत करून द्यावं लागणार असतं. देविकाने त्यासाठी कंबर कसलेली असते. सुदैवानं विश्वासला देविका सांगत असलेला त्याचा भूतकाळ हळूहळू पचनी पडू लागतो. मात्र, एके दिवशी तो आपल्या अॅड एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेला असताना त्याच्यासमोर पाच लाख रुपयांचे लव्हबर्ड्स आपण ऑर्डर केल्याचं एक बिल येतं. त्याला मोठंच आश्चर्य वाटतं, की का बरं आपण एवढे लव्हबर्ड्स ऑर्डर केले असावेत? तो त्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्या दुकानदाराला फोन लावतो तेव्हा साने नावाचा तो दुकानदार त्याला एक भलतीच चक्रावून टाकणारी माहिती देतो. लव्हबर्ड्स विक्रीचा सानेंचा धंदा हा निव्वळ दाखवण्यापुरता असतो. त्यांचा खरा व्यवसाय असतो तो गुप्तहेरगिरीचा! विश्वासनं सानेंना आपल्या बायकोवर- देविकावर पाळत ठेवण्याची कामगिरी सोपवलेली असते. त्याचंच ते पाच लाखाचं बिल असतं. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त विश्वास आणि देविका गोव्याला गेलेले असताना तिथं योगायोगानं त्यांना भेटलेल्या चित्रकार अभिजीतशी देविकाचे संबंध असावेत असा विश्वासला संशय आलेला असतो. म्हणून त्यानं त्यांची खबर काढण्यासाठी सानेंची मदत घेतलेली असते.
पूर्वस्मृती हरवून बसलेल्या विश्वासचा सानेंच्या या सांगण्यावर बिलकूल विश्वास बसत नाही. कारण देविका आपल्यावर किती जीवापाड प्रेम करते, हे तो तिच्या प्रत्यक्ष वागण्या-बोलण्यातूनच प्रत्यही अनुभवत असतो. अभिजीतशी तिचे ‘तसे’ काही संबंध असते तर तिनं आपण अपघातातून वाचावं म्हणून एवढं आकाशपाताळ एक केलं नसतं.
परंतु साने मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम असतात. अपघात झालेल्या दिवशीचा सगळा घटनाक्रम ते त्याला विस्तारानं सांगतात. त्या दिवशी देविका अभिजीतला एका हॉटेलात भेटली होती आणि त्यानंतर त्याच संध्याकाळी विश्वास दिल्लीला जाणार असल्याचं कळल्यामुळे तो तिच्या घरी आला होता. त्या दिवशी विश्वास दिल्लीला न जाता त्यांना रंगेहात पकडण्यासाठी थेट घरी परतला होता. हे अर्थातच त्यांच्यावर ठेवलेल्या पाळतीमुळे सानेंना कळलं होतं. काही वेळानं देविका आणि कुणी एक व्यक्ती एक भलामोठा पेटारा घेऊन घरातून बाहेर पडले आणि गाडीतून कुठेतरी निघून गेले. साने सांगत असलेल्या घटनाक्रमातील या तपशिलांमुळे विश्वास गोंधळात पडतो. त्यांच्या म्हणण्यात काहीएक तथ्यांश असू शकतो असं त्याला वाटू लागतं. परंतु मग देविकाचं आजचं आपल्याबरोबरचं प्रेमळ वागणं..? त्याची संगती कशी लावायची, असा त्याला प्रश्न पडतो.
घरी परतल्यावर विश्वास देविकाला या सगळ्या घटनाक्रमाबद्दल विचारतो. तेव्हा ती तसं घडल्याचं मान्य करते. विश्वासच्याच करणीमुळे गोव्यात घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगापासून अभिजीत आपल्याला ब्लॅकमेल करून आपल्याशी जबरदस्तीनं संबंध ठेवायला भाग पाडत होता, हेही ती कबूल करते. त्याला अपघात झाला त्या दिवशी विश्वासनं त्या दोघांना आपल्या घरात रंगेहात पकडल्यावर रागाच्या भरात अभिजीतचा गोळ्या घालून खून केला होता. आणि मग अभिजीतचं प्रेत पेटाऱ्यातून विल्हेवाट लावण्यासाठी आपण दोघांनी नेलं होतं. मात्र काहीएक कारण सांगून मधेच विश्वास तिला वाटेत सोडून निघून गेला होता. त्यानंतर तिनं एकटीनंच त्या प्रेताची विल्हेवाट लावून ती घरी परतली होती. ती घरी परतली नाही तोच तिला विश्वासच्या गाडीला अपघात झाल्याचा पोलिसांचा फोन आला होता..
देविकाच्या या सांगण्यात तथ्य असेल तर मग आपणच अभिजीतचे खुनी आहोत..? विश्वास भलताच हडबडून जातो. आपल्या हातून काय घडलं हे? आता यातून कसं सुटायचं? कधी ना कधी या खुनाला वाचा फुटणारच!
खुर्चीला खिळवणारे लव्हबर्ड्स
गिरीश जोशी लिखित-दिग्दर्शित ‘लव्हबर्ड्स’ हे सस्पेन्स थ्रिलर नाटक नुकतंच तिसऱ्यांदा रंगभूमीवर आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-06-2015 at 07:40 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Love birds marathi drama