पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंत नाटकाचा पडदा उघडायचा आणि प्रेक्षकांत जास्तीत जास्त चष्मे चमकायचे. पण गेल्या काही वर्षांत या अनुभवी चष्म्यांबरोबरच उत्सुक तरुण डोळेही चमकताना दिसतात. हे असे चमकणारे डोळे बघितले की मला आशेचा किरण दिसतो.
मराठी रंगभूमीला पावणेदोनशे वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. केवळ प्रदीर्घ परंपरा आहे एवढय़ामुळेच ती समृद्ध झाली असे नाही, तर या अविरत वाटचालीत सतत आधुनिकतेची कास धरणाऱ्या या रंगभूमीला आजवर लाभलेले अनेकानेक प्रयोगधर्मी पुरोगामी विचारांचे समर्थ नाटककार, त्यांच्या कसदार संहिता, नाटकांना लाभलेली अवीट संगीताची जोड, नवमन्वंतराचा ध्यास घेतलेले अनेक पिढय़ांचे दिग्दर्शक, कसलेले तालेवार कलावंत, कुशल तंत्रज्ञ या साऱ्याचा हिशेब मांडणंही अवघड. मराठी रंगभूमीवर सातत्याने अशा प्रकारे कसदार, सशक्त, मराठी संस्कृतीचा गाभा असलेलं नवं काहीतरी घडण्याची प्रक्रिया अव्याहत सुरू आहे. त्याकरता योगदान देणाऱ्या रंगकर्मीची नवी पिढी जितक्या जोमाने आणि वेगाने पुढे येत आहे तितक्या वेगाने प्रेक्षकांची पिढी मात्र निर्माण होत नाहीए, ही काहीशी खंत आहे. म्हणूनच आजच्या तरुणाईला नाटय़गृहाकडे खेचून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न होण्याची गरज मला वाटते. आणि त्याकरता काय करता येईल, हा विचारही सतत डोक्यात घोळत असतो. मराठी नाटकाचा स्वत:चा असा बांधलेला एक प्रेक्षकवर्ग आहे; जो आवर्जून नाटक बघत असतो. तो आणखीन वाढावा असं मला वाटतं. याकरता मला ‘टीनएज’मधून बाहेर पडलेल्या आणि स्वत:चं आयुष्य स्वत: ठरवू पाहणाऱ्या खास कॉलेजवयीन तरुण-तरुणींपर्यंत पोचावंसं वाटतंय. घरून मिळालेल्या पॉकेटमनीमधून ही मुलं जितक्या सहजपणे कॉफी शॉप किंवा सिनेमा थिएटरकडे वळतात, तितक्याच सहजपणे नाटय़गृहाकडेही वळावीत असं मला वाटतं. म्हणून एक योजना डोक्यात आली. खास कॉलेजच्या मुलांना शनिवार-रविवार (आणि सार्वजनिक सुटय़ांचे दिवस) सोडून आठवडय़ातील अन्य सर्व दिवशी ‘लव्हबर्ड्स’ या आमच्या नव्या नाटकाची तिकिटे १०० रुपये या सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावीत. एरव्ही ३०० आणि २०० रुपयांची तिकिटे महाग वाटतात म्हणून नाटकाकडे न वळणाऱ्या कॉलेजातील मुलांना नाटय़गृहाच्या तिकीट काऊंटरवर आपल्या कॉलेजचं ओळखपत्र दाखवून ही तिकिटे सवलतीच्या दरात मिळतील. ‘लव्हबर्ड्स’ नाटकाच्या १९ मेपासून होणाऱ्या पुढील २० प्रयोगांकरता ही योजना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अभिनेत्री म्हणून मी गेली जवळपास १५ र्वषे रंगभूमीवर वावरते आहे. आणि आता अलीकडेच मी नाटय़निर्मितीच्या क्षेत्रात उतरले आहे. इतकी वर्षे नाटक तरुणाईपर्यंत पोहोचविण्यासाठी जे करावंसं वाटत होतं ते प्रत्यक्षात करून बघण्याची संधी आज मला निर्माती या नात्याने मिळते आहे. त्यातून प्रेक्षागृहात चमकणाऱ्या उत्साही, तरुण डोळ्यांची संख्या निश्चितच वाढेल अशी मला खात्री आहे.
-मुक्ता बर्वे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा