अभिनेत्री विद्या बालन, परमब्रता चॅटर्जी आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांची मुख्य भूमिका असलेला ‘कहानी’ हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वोत्तम सस्पेन्स थ्रिलर्स पैकी एक ठरला. दिग्दर्शक सुजॉय घोष यांचा कहानी हा चित्रपट २०१२ साली रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाची रोमांचकारी पटकथा, विलक्षण आणि जबरदस्त दिग्दर्शन, धक्कादायक क्लायमॅक्स याची प्रेक्षकांना अक्षरशः भुरळ पडली. कहानी सिनेमा पाहून चित्रपट समीक्षकही आश्चर्यचकित झाले. अभिनेत्री विद्या बालनच्या ‘विद्या बागची’च्या भूमिकेतील अभिनयासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले. या चित्रपटात बिग बी अमिताभ बच्चन यांनीही आवाजाच्या माध्यमातून योगदान दिले. दरम्यान, फक्त आठ कोटी रुपयांमध्ये बनलेल्या ब्लॉकबस्टर कहानी चित्रपटाने जगभरामध्ये १०४ कोटी रुपयांची कमाई केली. हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये ५० दिवसांपेक्षा जास्त दिवस चालला. दिग्दर्शक सुजय घोष यांचा हा चित्रपट भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्तम सस्पेन्स थ्रिलर म्हणून ओळखला जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्योकी राणा, पोलिस अधिकारी

कहानी या चित्रपटातून बंगाली अभिनेता परमब्रता चॅटर्जीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटामध्ये सत्योकी राणा सिन्हा ही पोलिस अधिकाऱ्याची भूमिका त्याने साकारली आहे. दरम्यान चित्रपटाचे कथानक दुर्गा पुजेच्या उत्सवादरम्यान कोलकाता येथे हरवलेला विद्या बागचीच्या नवऱ्याचा शोध घेताना सुरू होते. यामध्ये सत्योकी राणा हे पात्र विद्याला मदत करताना दिसते. विद्या बालन म्हणजेच विद्या बागची ही या दरम्यान गर्भवती असते.

हेही वाचा: Stree 2: श्रद्धा कपूरचा ब्लॉकबस्टर ‘स्त्री २’ कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार? माहिती आली समोर

सास्वता चॅटर्जी खलनायकाच्या भूमिकेत

२०१२ मध्ये कहानीमधूनच बंगाली अभिनेते सास्वता चॅटर्जी यांनीही बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात त्यांनी खलनायक म्हणून ‘बॉब बिस्वास’ या पात्राची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये सास्वता फक्त आठ मिनिटांसाठी दिसले होते. परंतु या आठ मिनिटांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.

अमिताभ बच्चन यांनी गायले ‘एकला चालो रे’ गाणे

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी कहानी चित्रपटातील ‘एकला चालो रे’ हे बंगाली देशभक्तीपर गाणे गायले होते. कोलकाता मेट्रोमधील विषारी वायू हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्याला मारणाऱ्या विद्या या पात्राचा आणि दुष्ट महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गामातेच्या उत्सवाचा क्लायमॅक्समधील सीन अंगावर रोमांच उभा करतो. याचदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील एकला चालो रे गाण्याचा वापर दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने केला आहे. त्याचा प्रभाव प्रेक्षकांवर नक्कीच पडतो.

कहानी चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार

दरम्यान कहानी चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. सुजॉय घोष यांना सर्वोत्कृष्ट पटकथा, नम्रता जोशी यांना सर्वोत्कृष्ट संपादन आणि नवाजुद्दीन सिद्दीकीला ६० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला होता.

हेही वाचा: ‘मी कधीच कोणाला सांगणार नाही हा चित्रपट पाहा’, रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटावर फरहान अख्तरची नाराजी!

कहानी भाग २

दरम्यान, कहानीच्या जबरदस्त यशानंतर ‘कहानी टू’ हा सिक्वल देखील २०१६ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. विद्या बालन आणि अर्जुन रामपाल यांचा अभिनय असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस म्हणावा तितका उतरला नाही. त्यानंतर २०२१ मध्ये दिग्दर्शक सुजॉय घोष यांची मुलगी दिया घोष यांनी ‘बॉब बिस्वास’ नावाचा चित्रपट बनवला आणि झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला. अभिषेक बच्चन अभिनीत बॉब बिस्वास हा दिया घोष यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Low budget bollywood movie earned 100 crores won three national awards amitabh bachchan vidya balan sujoy ghosh kahaani 2012 spl