अभिनेता कार्तिक आर्यन सध्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटामुळे तो प्रकाशझोतात आला. शुक्रवारी कार्तिक आर्यन आणि क्रिती सनॉनची मुख्य भूमिका असलेला ‘लुका छुपी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी त्याने बॉक्स ऑफीसवर दमदार कमाई केली. कार्तिक आर्यनच्या आतापर्यंतच्या करिअरमधील हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार ‘लुका छुपी’ने शुक्रवारी ८.०१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे या चित्रपटाची सुरुवात चांगली झाली आहे. इतकंच नव्हे तर पहिल्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने ‘राजी’, ‘स्त्री’ आणि ‘बधाई हो’ला मागे टाकलं आहे. त्यामुळे ‘सोनू के टिटू की स्वीटी’नंतर हा कार्तिक आर्यनचा आणखी एक सुपरहिट चित्रपट ठरू शकतो.
वाचा : …म्हणून अक्षय कुमारवर चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी
लग्नाकडे पाहण्याचा आजच्या पिढीचा दृष्टीकोन खूपच वेगळा आहे. समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय आपलं आयुष्य त्याच्या हातात सोपवायचं नाही असं मानणारी ही पिढी आहे. या पिढीचं नेतृत्त्व करणाऱ्या गुड्डू आणि रश्मीची कहाणी ‘लुका छुपी’मध्ये सांगण्यात आली आहे. लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन आणि हास्याचा भरपूर तडका या चित्रपटात आहे.
कार्तिक आर्यनच्या चित्रपटांची पहिल्या दिवसाची कमाई-
२०११ : प्यार का पंचनामा- ९२ लाख रुपये
२०१५ : प्यार का पंचनामा २- ६.८० कोटी रुपये
२०१८ : सोनू के टिटू की स्वीटी- ६.४२ कोटी रुपये
२०१९ : लुका छुपी- ८.०१ कोटी रुपये