लग्नाकडे पाहण्याचा आजच्या पीढीचा दृष्टीकोन खूपच वेगळा आहे. समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय आयुष्य त्याच्या हातात सोपवायचं नाही असं मानणारी ही पिढी आहे. या पिढीचं नेतृत्त्व करणाऱ्या गुड्डू आणि रश्मीची कहाणी सांगणारा ‘लुका छुपी’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. लग्नापूर्वी होणाऱ्या नवऱ्याला जाणून घेण्यासाठी लिव्ह इनमध्ये राहण्याचा अट्टहास करणारी रश्मी आणि तिच्या हट्टामुळे पुढे निर्माण झालेल्या गोंधळाची धम्माल कथा ‘लुका छुपी’त आहे.
रश्मी(क्रिती सॅनॉन) मथुरातल्या एका राजकारण्याची मुलगी. वडील संस्कृती रक्षक आणि लिव्ह इन रिलेशनशिपच्या तीव्र विरोधात. वडिलांचा स्वभाव माहिती असतानाही रश्मी स्थानिक पत्रकार गुड्डू (कार्तिक आर्यन)च्या प्रेमात पडते. गुड्डू लग्न करायला तयारही होतो. मात्र लग्नापूर्वी गुड्डूविषयी अधिक जाणून घेता यावं यासाठी क्रिती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा पर्याय त्याला सुचवते. संभ्रमात सापडलेल्या दोघांना मदत करण्यासाठी पुढे येतो गुड्डूचा मित्र अब्बास (अपारशक्ती खुराना).
मात्र ही मदत दोघांच्या आयुष्यात आणखी गोंधळ निर्माण करते . लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या रश्मी -गुड्डूला नवरा बायको समजून गुड्डूचे कुटुंबीय घरी आणतात. लग्न झालेलं नसतानाही सत्य घराच्यांपासून लपवून ठेवण्यात दोघांची त्रेधातिरपीट उडते. हा गोंधळ निस्तरताना उडणारी धम्माल या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
कार्तिक- क्रितीची धम्माल केमिस्ट्री, पंकज त्रिपाठी आपरशक्तिच्या मनोरंजनाचा तडका या चित्रपटात पाहायला मिळत आहे. चित्रपटाची कथा अगदी साधी असली तरी कलाकरांच्या विनोदाचं अचूक टायमिंग प्रेक्षकांना खिळवून ठेवतं. लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन आणि हास्याचा भरपूर तडका या चित्रपटात आहे त्यामुळे एकदा प्रेमाचा हा लपंडाव पाहायला हरकत नाही.