रातभर सर्द हवा चलती रही..
रातभर हमने अलाव तापा
मैने माजी सें कई खुश्क सी शाखें काटी
तुमने भी गुजरे हुए लम्हों के  पत्ते तोडे
गीतकार गुलजार यांच्या ‘अलाव’ या कवितेतील पंक्ती.. मानवी नातेसंबंध हा अत्यंत नाजूक आणि तरीही गुंतागुंतीचा विषय आहे. या नात्यांचे बंध जितके  उलगडण्याचा प्रयत्न करावा तितके ते आणखीनच गुंतागुंतीचे होत जातात. कुठलंही नातं संपवणं तितकं सोप्पं नाही. त्या नात्यासोबत गुंफल्या गेलेल्या कित्येक आठवणी त्या नात्याबरोबर दफन कराव्या लागतात.. असा काहीसा गूढ आशय सांगणारी ‘अलाव’ या हळुवार कवितेचा संदर्भ लक्षात घेऊन त्यावर आधारित एकांकिका करण्याचे आव्हान गीतकार गुलजार यांनी तरुण रंगकर्मीसमोर ठेवलं आहे.
‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही ‘अस्तित्व’ या नाटय़संस्थेच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या एकांकिका स्पर्धेला या वर्षी गुलजार स्पर्श झाला आहे. यंदाच्या एकांकिका स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रंगकर्मीना एकांकिका करण्यासाठी दस्तुरखुद्द गुलजार यांनी विषय दिला आहे. सध्याच्या काळात नव्या लेखकांसमोर हा विषय ठेवण्यामागे गुलजार यांचा विशेष हेतू आहे. ‘नात्यातून वेगळे झालो, नाते तुटले असे आपण म्हणतो. पण, प्रत्यक्षात ते तुटलेले नसतेच. त्याचा तुटलेला बंध आयुष्यभर सलत राहतो. नाती सहज तुटण्याच्या आजच्या काळात याकडे नवे मराठी लेखक कसे पाहतात हे माझ्यासाठी औत्सुक्याचे आहे. लेखकांना लिहिण्याची नवी ऊर्मी देणारी स्पर्धा म्हणून ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ हा उपक्रम महत्त्वाचा वाटल्यामुळेच आपण हा विषय सुचवला आहे,’ असे गुलजार यांनी सांगितले. गुलजार यांची काव्यकल्पना आणि त्या अनुषंगाने त्यांची कविता अधिक सुगम, सहज, सोपी व्हावी यासाठी कवी वैभव जोशी यांनी त्याचा अनुवाद केला आहे. ‘शेकोटी’ असे त्यांनी अनुवाद केलेल्या कवितेचे शीर्षक आहे. या विषयाच्या अनुषंगाने रंगकर्मीना स्पर्धेत एकांकिका सादर करायची आहे. गुलजार यांची ही कविता आणि वैभव जोशींनी केलेला त्याचा भावानुवाद ‘अस्तित्व’च्या फेसबुक पेजवर तसेच astitva.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्पर्धेचे हे संयुक्त २९वे वर्ष असून खुल्या गटासाठी प्रथेप्रमाणे स्पर्धेच्या काही महिने आधी त्याचा विषय जाहीर केला जातो. तसेच या वर्षीही तो जाहीर करण्यात आला असून स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान घेतली जाईल, अशी माहिती ‘अस्तित्व’चे रवी मिश्रा यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी रवी मिश्रा यांच्याशी ९८२१०४४८६२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Story img Loader