सरत्या वर्षांत थोडय़ा फार फरकाने विषय-आशयाच्या बाबतीत नवनवे प्रयोग मराठी चित्रपटात झाले, पुढेही होतील. ‘धूम थ्री’चे प्रदर्शन हाच हिंदीतील खऱ्या अर्थाने शेवटच्या शुक्रवारचा चित्रपट ठरला असला, तरी वर्षअखेरीच्या शेवटच्या शुक्रवारी दोन बडे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्याचबरोबर नव्या वर्षांची सुरुवातही दमदार मराठी चित्रपटांनी होणार आहे. येत्या शुक्रवारी हिंदीतील अभिनेत्री ईशा कोप्पीकरचा पदार्पणातील मराठी चित्रपट ‘मात’ आणि मोहन जोशी, अमोल कोल्हे यांचा ‘रंगकर्मी’ असे दोन वेगवेगळ्या विषयांवरचे, आशयाची निराळी मांडणी असणारे बडे मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत. तर पुढील वर्षीच्या पहिल्या शुक्रवारी रवी जाधव दिग्दर्शित झी टॉकीज प्रस्तुत ‘टाइमपास’ हा बडा मराठी चित्रपट प्रदर्शित होतोय.
शेवटच्या शुक्रवारी दोन मराठी चित्रपट आमनेसामने आहेतच. त्याचबरोबर चित्रपटगृह मिळण्यासाठी या चित्रपटांना ‘धूम थ्री’ चित्रपटाशी स्पर्धा करावी लागतेय. विशेष मुलगी, तिचे संगोपन आणि समस्या या विषयावर ‘मात’ हा चित्रपट आहे. ‘रंगकर्मी’ हा एका तरुण रंगकर्मीचा प्रवास आणि संघर्ष याचे चित्रण असलेला चित्रपट आहे. मोहन जोशी यांच्यासारखा दिग्गज कलावंत आणि ‘छत्रपती शिवाजी’फेम डॉ. अमोल कोल्हे असे मुख्य कलावंत आहेत. रंगभूमीविषयक हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. नाटकांवर चित्रपट आले आहेत. परंतु, रंगभूमी, रंगभूमीची तत्त्वे, रंगमंचावर काम करण्याचे वेड या विषयावरचा हा चित्रपट आहे, असे दिग्दर्शक संजीव कोलते यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. मराठी नाटकाची संस्कृती व परंपरा उदात्त आहे हे चित्रपट सांगतो, असेही ते म्हणाले. केशव मल्हारराव इनामदार या तरुण रंगकर्मीचा उदय, त्याच्या गुरूच्या भूमिकेतील मोहन जोशी, त्यांचे नाते, संघर्ष टिपणारा हा चित्रपट आहे.
ईशा कोप्पीकरचा पहिला मराठी चित्रपट म्हणून त्याबाबत अपेक्षा आणि उत्सुकता असून तिच्यासोबत समीर धर्माधिकारी आणि छोटय़ा पडद्यावरची छोटी रमा अर्थात तेजश्री वालावलकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
नवीन वर्षांची सुरुवात ‘टाइमपास’ या प्रेमकथेने होत आहे. ‘नटरंग’ आणि ‘बालक पालक’ हे रवी जाधव यांचे दोन्ही चित्रपट वर्षप्रारंभीच प्रदर्शित झाले होते आणि त्यांनी अनेक विक्रमही नोंदवले. कोवळ्या वयातील प्रेम हा नाजूक विषय हाताळण्यात आला असून केतकी माटेगावकर आणि प्रथमेश परब प्रमुख भूमिकेत आहेत. प्राजक्ता आणि दगडू यांच्यातील प्रेम असा चित्रपटाचा विषय आहे. संगीताच्या बाबतीतही वैविध्य आहे. संगीतकार प्रवीण कुवर यांनी ‘रंगकर्मी’ला संगीतसाज चढविला असून सलील कुलकर्णीचे संगीत ‘मात’ला लाभले आहे. रवी जाधव यांचा चित्रपट म्हणजे संगीतमय असणारच. ‘टाइमपास’चे संगीत चिनार-महेश यांचे आहे. तिन्ही मराठी चित्रपटांच्या निर्मितीसंस्था मातब्बर असून वितरण, विपणनाच्या बाबतीतही चांगले प्रयत्न करण्यात आले आहेत, असे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा