बॉलिवूड अभिनेत्री क्रिसन परेरा (२७) हिला अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये अटक करण्यात आली होती. ड्रग्ज प्रकरणात दोषी ठरवून तिला शारजाह येथील तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. पण या प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर क्रिसन परेराची बुधवारी तुरुंगातून सुटका करण्यात आली. ती २६ दिवस तुरुंगात होती. तुरुंगातून सुटल्यानंतर क्रिसनने एक पत्र लिहून तुरुंगातील कटू आठवणी सांगितल्या आहेत.
पत्रात क्रिसनने सांगितलं की, २६ दिवस तुरुंगात असताना, तिने कपडे धुण्याचा डिटर्जंट पावडर ‘टाइड’ने आपले केस धुतले. एवढेच नव्हे तर टॉयलेटचं पाणी वापरून कॉफी बनवली. बुधवारी सायंकाळी क्रिसन परेराची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. ती लवकरच भारतात परतेल, अशी माहिती मिळत आहे.
क्रिसनने पत्रात लिहिलं, “प्रिय योद्धा, तुरुंगात पेन आणि कागद शोधण्यासाठी मला तीन आठवडे आणि पाच दिवसांचा कालावधी लागला. मी ‘टाइड’ने (डिटर्जंट पावडर) माझे केस धुतल्यानंतर आणि टॉयलेटच्या पाण्याचा वापर करून कॉफी बनवल्यानंतर, मी बॉलीवूड चित्रपट पाहिले. माझ्या महत्वाकांक्षेने मला इथे तुरुंगात आणलं, हे जाणून माझ्या डोळ्यात कधी कधी अश्रू आले. आपली संस्कृती, आपले चित्रपट आणि टीव्हीवरील ओळखीचे चेहरे पाहून मला कधी कधी हसू यायचं. मला भारतीय असल्याचा आणि भारतीय चित्रपट उद्योगाशी संबंधित असल्याचा अभिमान वाटतो,” असं क्रिसनने पत्रात लिहिलं आहे. तिचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
बोरिवली येथील बेकरी मालक अँथनी पॉल (३५) याने क्रिसन परेराला एका अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात फसवलं होतं. आरोपी पॉलने आपला मित्र राजेश बोराटे याच्याशी संगनमत करत क्रिसनशी संपर्क साधला. आरोपी राजेशने आपण टॅलेंट मॅनेजर असल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी क्रिसनला शारजाह येथे एका आंतरराष्ट्रीय वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं. यासाठी विमानाचं तिकीट आणि हॉटेल बुकिंगही केलं. १ एप्रिलला ती शारजाहला रवाना होणार होती, तत्पूर्वी आरोपी रवीने तिला अमली पदार्थ दडवलेलं स्मृतीचिन्ह भेट दिलं. यानंतर आरोपी रवीनेच शारजाह येथील पोलिसांना याबाबत गुप्त माहिती दिली. गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी क्रिसन परेराला अटक केली. पोलिसांनी क्रिसनला दोषी ठरवून शारजाह येथील तुरुंगात पाठवलं. २६ दिवसानंतर आरोपी रवी आणि अँथनी पॉलचं बिंग फुटलं. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर अभिनेत्री क्रिसन परेराची तुरुंगातून सुटका करण्यात आली.