|| सुहास जोशी
भारतीयांचे विवाह सोहळे म्हणजे भारतीय मानसिकतेचं अगदी सर्वच बाबतीतले सांगोपांग चित्र मांडणारी महत्त्वाची घटना म्हणता येईल. लग्न ठरण्यापासून ते मुलीची सासरी रवानगी होईपर्यंतच्या प्रत्येक घटनेमागे काही ना काही बऱ्यावाईट गोष्टी घडत असतात. या एकाच घटनेमध्ये मानपान, घराण्याची इज्जत, प्रथा परंपरा पाळण्याची कसरत, अंधश्रद्धांचा पगडा, व्यक्तिस्वातंत्र्य असं सारं इतकं काही ठासून भरलेले असते की हा विषय कैक र्वष लेखक, दिग्दर्शकांना पुरून उरतोच आणि आकर्षित करत राहतो. तसंच आकर्षण ‘मेड इन हेवन’ या वेबसीरिजच्या निर्मितीलादेखील कारणीभूत ठरलेलं आहे. पण त्या आकर्षणाचं चीज झालं असं काही दिसून येत नाही. किंबहुना कालांतराने हे सर्व इतके एकसुरी होऊन जाते की त्यातील नावीन्यच निघून जाते. ही मालिका म्हणजे केवळ घडण्या-बिघडण्याचा सोहळा होऊ न जातो..
म्हटलं तर ही एक सलग कथा आणि त्याच वेळी ही अनेक कथांमध्ये असलेली एक कथा असं काहीसं याचं कथानक आहे. तारा खन्ना आणि करण मेहरा हे दोघेही एकत्रितपणे विवाह सोहळा व्यवस्थापनाचा व्यवसाय करत असतात. तारा मोठय़ा घरातील सून तर करण हा आई-वडिलांपासून एकटा राहणारा समलिंगी. दोघेही उच्चभ्रू लग्नांची कामं घेत असतात. त्या प्रत्येक लग्नाची गोष्ट एकेका भागात दिसते. पण प्रत्येक लग्नात लग्न व्यवस्थापनातील अडचणींपेक्षा वधू-वरांशी संबंधित वेगवेगळ्या अडचणी सोडवतानाच ते मालिकेत दिसतात. मग कधी एखाद्या ठिकाणी विवाहपूर्व संबंधामुळे करावा लागलेला गर्भपात असतो, कधी एखाद्या लग्नात आयत्या वेळी हुंडा मागितल्यामुळे मुलीने मोडलेले लग्न असते, कधी एखाद्या मुलाने त्याच्यातील कमतरता लपवून केलेले लग्न असते, तर कधी ज्येष्ठांच्या लग्नाबद्दल मुलांची नाराजी असते. हे दोघे विवाह सोहळा व्यवस्थापक लोकांच्या लग्नातील या सर्व समस्यांवर मध्यस्थाची भूमिका पार पाडतात. आणि हे सर्व सुरू असताना तारा आणि करण यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी, त्यांच्या सहकाऱ्यांच्या वैयक्तिक अडचणी असे सारे त्याबरोबरच उलगडत जाते.
अशा पद्धतीच्या मांडणीत एक फायदा असतो, एक कथा त्या त्या भागातच संपून जाते, त्या कथेवर पुन्हा मेहनत घ्यावी लागत नाही, तर समांतरपणे सुरू असलेली दुसरी कथा संथपणेच सुरू ठेवायची असते, त्यामुळे तेथेही फार धावपळ नसते. हा फायदा मालिकाकर्त्यांनी घेतला आहे. पण यामुळेच कोणत्याही एका कथेचा पुरेसा प्रभावच पडत नाही. सगळा भर केवळ त्रुटी मांडण्यावरच असल्यासारखे दिसते. हे त्रुटींचे प्रसंग कसे आणि कोठे बसवायचे यातच कथाकाराची शक्ती खर्च होते. मग असे प्रसंग टेंगूळ आल्यासारखे मध्येच गंभीर समस्यादर्शक प्रश्न आणि पुन्हा कथा पुढील पानावर सुरू राहते. सर्व पाहिल्यावर इतकंच जाणवतं की सगळीकडे घरोघरी मातीच्याच चुली. स्तर कोणताही असो, समस्येचे स्वरूप बदलते, पण मानसिकता तीच राहते. त्यामुळे एका टप्प्यानंतर हे सारे एकदम अपेक्षित होऊ न जाते. त्यातील विरोधाभासाची तीव्रता जाणवण्यापेक्षा तो खटकू लागतो. त्यात मध्येच उपरती झाल्याप्रमाणे हे दोघे विवाह व्यवस्थापक मध्यस्थापेक्षा एकदम सामाजिक वगैरे विचारी भूमिका घेऊ लागतात.
त्यात पुन्हा हळूच समलैंगिकत्वाच्या मुद्दय़ाला हात घालण्याचा अनाठायी प्रयत्न दिसून येतो. हा मुद्दा आज सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला आहे. मालिकेतील कथानकाची मांडणी पाहता कथेतील काळ हा सध्याचा असल्याचे दिसून येते. किंबहुना तो काळ जुना आहे असे कोठेही जाणीवपूर्वक दर्शवलेले नाही. अशा वेळी समलैंगिकत्वाचा मुद्दा वापरून तुरुंगापर्यंत जाण्याचे प्रसंग हे केवळ सनसनाटीपणा निर्माण करणारेच ठरतात.
बाकी बाह्य़चित्रीकरण, सेट वगैरे बाबींमध्ये मालिका बरीच बरी आहे. झगमगाटीपणा, श्रीमंतीचे खच्चून प्रदर्शन वगैरे करण्यात यश मिळाले आहे. पण मुळातच कथानकात आणि मांडणीत दम नसेल तर केवळ मोठय़ा दिग्दर्शक-निर्मात्यांची नावं वापरून केला देखावाच असं याला म्हणावं लागेल. खरं तर यातील सर्व कथांचा सूर हा अशा निव्वळ देखाव्याशीच निगडित आहे, पण हे दाखवण्यापायी मूळ कथादेखील देखावाच झाली आहे हे नक्की.
- मेड इन हेवन – सीझन पहिला
- ऑनलाइन अॅप – अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ