एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री मधुबाला यांच्या बायोपिकची सध्या बरीच चर्चा आहे. या चित्रपटात मधुबाला यांच्या आयुष्यातील बऱ्याच माहिती नसलेल्या घटना दाखवल्या जाणार आहेत. अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचे पती टूटू शर्मा मधुबाला यांच्या बायोपिकची निर्मिती करणार आहेत. पण याची घोषणा झाल्यानंतर मधुबाला यांची बहीण मधुर भूषण यांनी मात्र याला विरोध केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी टूटू शर्मा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. विशेष म्हणजे काही काळापूर्वीच मधुर यांनी आपल्या बहिणीच्या बायोपिकवर भाष्य केलं होतं.
काही महिन्यांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीत मधुर भूषण यांनी मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या लव्ह स्टोरीवर भाष्य केलं होतं. पण आता त्यांना दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या नात्याबद्दल लोकांना काहीच कळू नये असं वाटतं. त्यामुळे आता त्या बहीण मधुबाला यांच्या बायोपिकला विरोध करत आहेत.
आणखी वाचा- मधुबालाशी लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी बदलला होता धर्म? बहिणीनं केला मोठा खुलासा
‘इ-टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, मधुर भूषण यांनी मधुबाला आणि दिलीप कुमार यांची लव्ह स्टोरी मोठ्या पडद्यावर दाखवण्यास विरोध केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुबाला यांची लव्हस्टोरी आणि खासगी आयुष्य या बायोपिकमध्ये मसाला लावून दाखवलं जाईल अशी भीती मधुर भूषण यांना वाटत आहे. अर्थात बायोपिकमध्ये दिलीप कुमार यांचा उल्लेख करण्यास त्यांचा विरोध नाही. मात्र त्यांचं खासगी आयुष्य वेगळ्या पद्धतीने दाखवलं जाईल अशी भीती त्यांना वाटत आहे.
फेब्रुवारी २०२२ मध्ये ‘इ-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत, मधुर भूषण यांनी मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमकहाणीबद्दल आणि नातेसंबंधातील वादांबद्दल सांगितलं होतं. मधुर भूषण यांनी सांगितले होते की, ‘नया दौर’ चित्रपटाच्या प्रकरणामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मधुबाला आणि दिलीप कुमार चिडले आणि दोघांमध्ये गोष्टी बिघडल्या. मधुरच्या म्हणण्यानुसार, ‘कदाचित देवाला हे मान्य नव्हतं आणि त्यांचं नातं संपलं.’
आणखी वाचा- “तो उत्कृष्ट अभिनेता आहेच पण मी…” आर माधवनशी होणाऱ्या तुलनेवर सैफ अली खानचं मोठं वक्तव्य
मधुर भूषण यांनी सांगितले होते की, बीआर चोप्रा यांनी ग्वाल्हेरच्या डोंगराळ भागात ‘नया दौर’चे शूटिंग करावे असे त्यांच्या वडिलांना वाटत नव्हते. शूटिंगच्या काही दिवस आधी तिथे काही महिलांवर अत्याचार झाला होता. अशा परिस्थितीत मधुबालाच्या वडिलांना आपली मुलगी सुरक्षित राहावी अशी इच्छा होती. मधुबाला यांचे वडील आणि बीआर चोप्रा आपापल्या मतांवर ठाम होते. या प्रकरणात मधुबालाला पाठिंबा देण्याऐवजी दिलीप कुमार यांनी बीआर चोप्राची बाजू घेतली आणि अभिनेत्रीच्या कुटुंबावर गुन्हा दाखल केला. दिलीप कुमार यांनी आपल्या कुटुंबाची माफी मागावी अशी मधुबालाची इच्छा होती, पण दिलीप कुमार यांनी तसे करण्यास नकार दिला. यावरून मधुबाला आणि दिलीप कुमार यांचे नाते संपुष्टात आले.
दरम्यान, मधुबाला यांच्या बायोपिकवर टुटू शर्मा म्हणाले, ‘माझा बायोपिक, ‘मधुबाला: दर्द का सफर’ या बायोग्राफीवर आधारित आहे. हे पुस्तक सुशीला कुमारी यांनी लिहिले आहे. मुधाबाला या एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे त्याची कथा चित्रपटाच्या रुपात मोठ्या पडद्यावर दाखवली जावी जेणेकरून जनतेला पाहता येईल. माझा विश्वास आहे की हा एक प्रस्थापित कायदा आहे की पब्लिक फिगर असलेल्या व्यक्तीच्या जीवनावर कोणीही कॉपीराइटचा दावा करू शकत नाही, अगदी त्यांचे नातेवाईकही नाही. तसे असते तर आपल्या देशाच्या इतिहासातील नामवंत व्यक्तींवर इतके जीवनपट आपण पाहिले नसते. टुटू शर्मा अजूनही आपल्या मतावर ठाम आहेत.