संदेश कुलकर्णी लिखित आणि अमृता सुभाष दिग्दर्शित ‘असेन मी नसेन मी’ नाटक सध्या मराठी रंगभूमी गाजवताना दिसत आहे. या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष यांनी पाहायला मिळत आहे. नुकतंच ‘असेन मी नसेन मी’ हे नाटक मधुगंधा कुलकर्णीने पाहिलं आणि भरभरून कौतुक केलं आहे.
लोकप्रिय अभिनेत्री, लेखिका, निर्माती मधुगंधा कुलकर्णीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ‘असेन मी नसेन मी’ नाटकाचं कौतुक केलं आहे. नाटकाचं पोस्टर शेअर करत मधुगंधाने लिहिलं आहे, “कधी कधी असं होतं की तुम्ही एखादी कलाकृती बघता आणि ती तुमची पाठ सोडत नाही. रेंगाळत राहते, त्यातले बारकावे आपण मनातल्या मनात घोळवतं. ते नाटक तुम्हाला प्रेरित करत राहतं. खोल खोल काहीतरी ढवळून निघत. थोडी भीती, थोडी करुणा. थोडा हळवेपणा आणि खूप सारा आनंद, असं भावविभोर होणं हल्ली दुर्मिळच! ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाने मला अंतर्बाह्य हलवून टाकलं आहे. नाटक बघत असताना अंगावर शहारा येण्याचा अनुभव मी घेतला आणि न राहून मी ही पोस्ट लिहायला घेतली. संदेश आणि अमृता या जोडीने रंगमंचावर आणलेलं हे नाटक अलौकिक आनंद देऊन जातं.”
पुढे मधुगंधा कुलकर्णीने लिहिलं, “संदेशने ज्या संवेदनशीलतेने हे नाटक लिहिलेलं आहे त्याला तोड नाही. स्त्री मनाचे इतके कंगोरे एक पुरुष असून त्याने इतके लीलया उलगडून दाखवले आहेत की आपण स्तिमित होतो. स्त्री मनाचे अनेक पदर एस एल भैरप्पानंतर संदेशने त्या ताकदीने दर्शविली आहेत. मित्रा लेखक म्हणून केवळ कमाल! या नाटकाची दिग्दर्शिका अमृता.. तिचं हे पहिलंच नाटक पण पाहताना ते जाणवत नाही…मातब्बर आणि जाणकार दिगर्शकेसारखं तिने हे नाटकं सहज बसवलं आहे. इतकं की आपण त्या घरात आहोत आणि आपल्या साक्षीने सगळं घडतं आहे असं वाटत राहतं.”
“गोष्ट साधी सोपी आणि आपल्या घरातली आहे. आई आणि मुलगी त्यांच्या नात्यातला, आयुष्यातला, मनातला ताण आणि आईचं वाढत जाणार आजारपण. त्यात दोघींची होणारी घालमेल, ससेहोलपट आपण त्या सगळ्यांचा प्रेक्षक न राहता भाग बनून जातो हे लेखक दिग्दर्शकाच श्रेय आहे. समोर स्टेजवर एक नाटक घडत असताना. तुमच्या मनाच्या अवकाशात तुमचं तुमचं..तुमच्या पात्रांचं नाटक रंगत जातं,” असं मधुगंधाने लिहिलं आहे.
त्यानंतर मधुगंधाने लिहिलं की, प्रेक्षक म्हणून आपल्या मनातलं आणि स्टेजवरचं नाटक कुठल्या तरी क्षणी तादात्म्य पावत याला अजून एक कारण म्हणजे नाटकात काम करणारे कलाकार…नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता सुभाष या तिघीही कसलेल्या अभिनेत्रींनी ही पात्र अक्षरशः जिवंत केली आहेत. एक अशी अभिनयाची जुगलबंदी सुरू होते की आपण आवक होत जातो. हे नाटक अभिनयाने उंचावत जाणारी मैफिल वाटत राहतं. आपण रंगून जातो. डोळे भरून येतात, आत खोल कालवाकालव सुरू होते आणि एक अत्यंत परमोच्च क्षण गाठून ही मैफिल थांबते. आपण ते सगळं घेऊन बाहेर पडतो. सुंदर अनुभव.
“प्रदीप मुळे यांचं नेपथ्य नेटकं, सुरेख, सुटसुटीत. कपडेपट, रंगभूषा , प्रकाश योजना, संगीत… सगळं नाटकाची उंची गाठण्यास अत्यंत समर्पक आणि सुंदर. अमृता सुभाष, संदेश कुलकर्णी, शुभांगी गोखले आणि नीना कुळकर्णी या नितांत सुंदर अनुभवासाठी खूप खूप आभार आणि प्रेम .
हे नाटक जरूर पाहा,” असं मधुगंधा कुलकर्णीने आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे.
दरम्यान, मधुगंधा कुलकर्णीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, १ जानेवारीला तिचा ‘मु.पो. बोंबिववाडी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अभिनेते प्रशांत दामले, वैभव मांगले, गितांजली कुलकर्णी, अद्वैत दादरकर, दीप्ति लेले, रितिका श्रोत्री असे अनेक कलाकार मंडळी झळकले होते.