समाजातील दाहक वास्तव आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा हातखंडा आहे. ‘चांदनी बार’, ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘फॅशन’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून त्यांनी समाजातील विविध क्षेत्रांतील सत्यस्थिती मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणाऱ्या मधुर भांडारकर यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. आकाश पेंढारकर दिग्दर्शित ‘सर्किट’ या चित्रपटाची प्रस्तुती आणि निर्मिती मधुर भांडारकर यांनी केली आहे.
अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही नवी जोडी ‘सर्किट’ या चित्रपटात झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत निर्माता म्हणून पदार्पणाबाबत मधुर भांडारकर म्हणाले,‘‘गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटाने घेतलेली भरारी मी जवळून पाहिली आहे. मी हिंदी चित्रपटात कार्यरत असलो, तरी मराठी चित्रपट आवर्जून पाहतो. त्यामुळेच मराठी चित्रपटाची निर्मिती-प्रस्तुती करण्याची इच्छा होती. ती संधी मला ‘सर्किट’ या चित्रपटाद्वारे मिळाली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे’’.
मराठी चित्रपटसृष्टीत आशय आणि विषयांच्या बाबतीत नवे प्रयोग दिग्दर्शक, निर्माते, लेखकांकडून केले जात असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर नव्या कलाकारांच्या जोडय़ाही प्रेक्षकांना पाहायला मिळतात. ‘सर्किट’मधून वैभव तत्त्ववादी आणि हृता दुर्गुळे पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. ‘टाइमपास ३’, ‘अनन्या’ आणि आता ‘सर्किट’ अशा विविध विषयांवर आधारित चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारणारी हृता म्हणते, ‘‘आपण प्रामाणिकपणे केलेलं काम एका चांगल्या निर्मिती संस्थेच्या आणि दिग्दर्शकाच्या हातातून प्रेक्षकांसमोर आलं तर त्याचा आनंद अधिक असतो. शिवाय या चित्रपटात पुन्हा एकदा नव्या प्रकारची भूमिका साकारायला मिळत असल्याचा आनंद आहे’’.
‘सर्किट’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांनी त्याला भरभरून दाद दिली आहे. प्रेमपटाला अॅक्शनची जोड दिलेला हा चित्रपट ७ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनचे पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनचे प्रभाकर परब यांनी केली असून स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार हे सहनिर्माते आहेत.