करिना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान फक्त दोन वर्षांचा आहे. मात्र त्याची लोकप्रियता एखाद्या सुपरस्टार इतकी आहे. त्याच्या याच लोकप्रियतेमुळे काही महिन्यांपूर्वी बाजारात ‘तैमुर कुकीज’ आणि ‘तैमुर खेळणी’ आली होती. त्यानंतर आता तैमुरवर आधारित चित्रपटाची निर्मिती होणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते मधुर भांडारकर हे तैमुरवर आधारित चित्रपट काढणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र या वृत्ताचं मधुर भांडारकर यांनी खंडण करत असा कोणताही चित्रपट करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपूर्वी मधुर भांडारकर यांनी चित्रपटासाठी ‘तैमुर’ या नावाची नोंदणी केल्याचं सांगण्यात आलं होतं. याबाबत भांडारकर यांना विचारले असता त्यांनी मात्र असा कोणताही चित्रपट तयार करत नसल्याचे स्पष्ट केलं.”माझ्या प्रोडक्शन हाऊसकडून कायमच वेगवेगळी नावे रजिस्टर केली जात असतात. ‘अवॉर्ड’, ‘बॉलिवूड वाइब्स’ अशी नावं या आधीदेखील रजिस्टर करण्यात आली आहेत. मात्र आम्ही सारेच चित्रपट करु असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे तैमुरवरदेखील आम्ही चित्रपट करणार नाहीये. सध्या मी वाळू माफियांवर आधारित ‘घालिब’ या चित्रपटामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे माझं लक्ष केवळ याच चित्रपटाकडे आहे”, असे भांडारकर यांनी सांगितलं.
मधुरने आतापर्यंत ‘पेज ३’, ‘फॅशन’, ‘हिरोईन’, ‘कॅलेंडर गर्ल्स’ असे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. त्यामुळे ‘तैमुर’चं नाव पाहता हा चित्रपट ‘पापराझी कल्चर’वर आधारित असेल का असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र या साऱ्यावर मधुर यांनी पडदा टाकला आहे.