हिंदी चित्रपटसृष्टीत नाव मिळवणारा मराठी दिग्दर्शक ही मधुर भांडारकर यांची ओळख आहे. ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘हिरॉइन’सारखे वेगळ्या विषयांवरचे चित्रपट देणाऱ्या या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या दिग्दर्शकाने मराठी चित्रपट केला तर नक्कीच त्याचे स्वागत होईल. मात्र, सध्या तरी मधुर हिंदीत इतके  रमले आहेत की मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन ही अजून लोकांसाठी स्वप्नवत गोष्ट आहे. पण, दुधाची तहान ताकावर.. म्हणतात ना तसेच मधुर भांडारकर यांनी पूर्ण मराठी चित्रपट नाही, पण मराठी चित्रपटाचे पहिले आणि एकच दृश्य दिग्दर्शित करून आपली तहान भागवली आहे.
मधुर भांडारकर यांच्या ‘जेल’, ‘फॅ शन’ आणि ‘हिरॉइन’ चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शन करणारे आशीष भेलकर हे ‘स्टोरी हाय, पण खरी हाय’ नामक चित्रपटाद्वारे मराठीत स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून सुरुवात करत आहेत. या चित्रपटाचे निर्माते संजय मेहता यांनीही रामगोपाल वर्मा, प्रभुदेवा, सुधीर मिश्रा यांच्यासारख्या नावाजलेल्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांसाठी कार्यकारी निर्माते म्हणून काम पाहिले आहे. या चित्रपटाचा मुहूर्त भांडारकर यांच्या हस्ते करण्यात आला आणि मुहूर्ताचे पहिलेच दृश्यही भांडारकर यांनी दिग्दर्शित केले. ‘मला पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाच्या पहिल्या दृश्याचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद वाटतो. मराठी चित्रपटांवर माझे प्रेम आहेच. पण आज ज्या वेगाने मराठी चित्रपट पुढे जात आहेत त्याचे खरोखर कौतुक करायला हवे’, अशा शब्दांत भांडारकर यांनी मराठी चित्रपटकर्मीना दाद दिली.
मधुर भांडारकर यांचे छोटेखानी दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अभिनेता अनिके त विश्वासराव मुख्य भूमिकेत आहे. प्रेम म्हणजे काय, याचा नव्याने विचार करायला लावणारी ही कथा असून लेखन उमेश जंगम यांचे आहे. सध्या ‘मॅडमजी’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असलेले मधुर भांडारकर पूर्णपणे मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन कधी करणार, या प्रश्नाचे उत्तर अजून तरी भांडारकर यांनी दिलेले नाही.

Story img Loader