बॉलीवूडची एकेकाळची नंबर वन अभिनेत्री अर्थात माधुरी दीक्षित आता चक्क ‘ढिशुम ढिशुम’ करणार आहे तर अभिनेत्री जुही चावला एक राजकारणी व्यक्तिमत्व साकारतेय. स्त्रीप्रधान व्यक्तिरेखा असलेल्या या चित्रपटात माधुरी दीक्षित प्रथमच आपल्या प्रतिमेतून बाहेर पडत हाणामारीची दृश्ये करतेय. तर आपल्या खटय़ाळपणाच्या, साध्या-सरळ व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री जुही चावला ‘गुलाब गँग’द्वारे प्रथमच महिला राजकारण्याची व्यक्तिरेखा साकारतेय.
दोन्ही समकालीन अव्वल अभिनेत्री असून प्रथमच चित्रपटात एकत्र काम करीत असून ‘रा.वन’चा दिग्दर्शक अनुभव सिन्हा या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. माधुरी दीक्षित-नेने आणि जुही चावला आता ‘टिपिकल’ बॉलीवूड नायिका सादर करण्याच्या वयाच्या पलिकडे गेल्या असून त्यामुळेच आपली चाहत्यांच्या मनातील प्रतिमा पुसून टाकून नव्या पद्धतीची व्यक्तिरेखा ‘गुलाब गँग’मध्ये साकारीत आहे. नवोदित दिग्दर्शक सैमिक सेन या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे.
माधुरी आणि जुही यांनी यापूर्वी साकारलेल्या व्यक्तिरेखा, प्रेक्षकांच्या मनातील त्यांची प्रतिमा याला छेद देऊन वेगळ्या छटा असलेल्या परंतु चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारत असून माधुरीचे भारतात पुनरागमन झाल्यानंतरचा तिचा पहिला चित्रपट असल्यामुळे बॉलीवूडमध्ये आपल्या दुसऱ्या डावाची सुरुवात दमदार करण्यासाठीच तिने आपल्या वयाला साजेशी आणि विशेष म्हणजे गँगच्या प्रमुखपदाची भूमिका साकारण्याचे ठरविले असावे.
बॉलीवूडची आघाडीची नृत्यांगना अभिनेत्री या प्रतिमेबाहेर जाऊन माधुरी साकारत असलेली व्यक्तिरेखा आणि सरळ-साध्या तरुणीची, सालस प्रेयसीची काहीशी अवखळ पण समंजस अशा स्वरूपाची प्रतिमा असलेली जुही चावला चक्क खलनायकी छटा असलेली बुंदेलखंड परिसरातील महिला राजकारणी साकारत असल्याने प्रेक्षक दोघींना कसे स्वीकारतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. जूनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता असून माही गिल, तनिष्ठा चटर्जी, प्रियांका बोस, दिव्या जगदाळे यांच्याही भूमिका आहेत.

Story img Loader