आपल्या अभिनय कौशल्याने आणि नृत्याच्या जोरावर अनेकांच्या मनावर जादू करणारी अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. माधुरी आज बॉलिवूडमध्ये ‘धकधक’ गर्ल म्हणून ओळखली जाते. माधुरीने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यासोबत सध्या तिने अनेक डान्स शो चे परिक्षक म्हणूनही काम पाहिले आहे. माधुरी ही सिनेसृष्टीत तितकीशी सक्रीय नसली तरी ती कायमच चर्चेत असते. नुकतंच माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते दोघेही नाचताना दिसत आहे.
माधुरी आणि तिचे पती श्रीराम नेने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ती अनेकदा त्यांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच माधुरी आणि श्रीराम नेने यांचा नाचतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यात ते दोघेही ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटातील प्रसिद्ध ‘तम्मा तम्मा अगेन’ गाण्यावर नाचताना दिसत आहे.
त्यांचा हा व्हिडीओ अनेक चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर व्हायरल केला आहे. तसेच यावर अनेक नेटकरी लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहे. हा संपूर्ण व्हिडीओ श्रीराम नेने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीचा असल्याचे सांगितलं जात आहे. मात्र अद्याप याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
माधुरी आणि तिच्या पतीचा हा व्हिडीओ दिग्दर्शक आणि कोरिओग्राफर फराह खानला प्रचंड आवडला आहे. यावर फराह खानने ‘हॅपी बर्थडे राम’ अशी कमेंट करत ‘तुम्ही माधुरी दीक्षितसोबत स्पर्धा करत आहात’, असेही तिने म्हटले आहे.
Gangubai Kathiawadi : ‘ढोलिडा’ गाण्यावर रणवीर सिंह आणि आलिया भट्टचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ
माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांचा विवाह १९९९ मध्ये झाला होता. श्रीराम हे व्यवसायाने डॉक्टर असून ते अमेरिकेत स्थायिक होते. लग्नानंतर माधुरीनेही अभिनय क्षेत्राकडे पाठ फिरवली होती. ती अमेरिकेत राहू लागली होती. मात्र, आता फार वर्षानंतर माधुरी आणि श्रीराम आपल्या मुलांसह भारतात स्थायिक झाले आहेत. माधुरीने २००७ मध्ये ‘आजा नचले’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. यानंतर ती ‘गुलाब गँग’, ‘ये जवानी है दिवानी’, ‘कलंक’ आणि ‘टोटल धमाल’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकली.