‘इश्किया’चं यश हे खालूजान-बब्बन या अफलातून जोडगोळीच्या अचाट पराक्रमांचं होतं. असं असलं तरी सध्या ‘देढ इश्किया’विषयी चर्चा करताना या दोघांपेक्षा कौतुक होतंय ते ‘बेगम पारा’चं.. मग ‘देढ इश्किया’ ही गोष्ट नेमकी कोणाची? खालूजान आणि बब्बनची की बेगम पाराची? ‘इश्किया २’ होऊ शकलं असतं की ते ‘देढ’ का आहे?.. अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती त्याच्यावर होते आहे. कारण, उत्तरं फक्त त्याच्याकडे आहेत. ‘धक धक’ करत करत एकेकाळी प्रेक्षकांवर मोहिनी घालणाऱ्या माधुरी दीक्षितला ‘बेगम पारा’ म्हणून आणणारा, ‘इश्किया’ देढने वाढवणारा दिग्दर्शक अभिषेक चौबे या इसमाकडून तुम्ही ‘देढ इश्किया’ची कथा ऐकाल तर माधुरीच्या बेगमसह अख्खं मेहमूदाबाद तुमच्या डोळ्यासमोर उभं राहील..
झारखंडमध्ये लहानाचा मोठा झालेल्या अभिषेक चौबेने मुंबईत झेविअर्समधून चित्रपटनिर्मितीचे शिक्षण घेतलं. त्याची जोडी जमली ती दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्याबरोबर. विशाल भारद्वाजही तेव्हा पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शनाचा श्रीगणेशा करणार होते. ‘मकडी’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या निमित्ताने दोघांचीही जोडी जमली. मग विशाल भारद्वाज यांच्याबरोबर दिग्दर्शनाचे धडे गिरवता गिरवता अभिषेक स्वत:च ‘इश्किया’च्या निमित्ताने स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून पुढे आला. तोवर त्याच्या चित्रपटांना मातब्बर दिग्दर्शक म्हणून नावाला आलेल्या विशाल भारद्वाज यांचाच निर्माता म्हणून पाठिंबा मिळाला होता. अभिषेकच्याच भाषेत सांगायचं तर आमच्यात मैत्रीचं नातं जे निर्माण झालं ते आजतागायत कायम आहे. ते ज्या वेळी दिग्दर्शक होण्यासाठी धडपडत होते तेव्हा मी तेविशीचा होतो. आज त्यांच्याबरोबरच हे माध्यम समजून-उमजून घेत मी मोठा झालो. त्यामुळे आज मी त्यांच्या तेव्हाच्या वयात आणि भूमिकेत आहे. पण, यादरम्यानच्या काळात आमचं नातं इतकं घट्ट झालं की ते निर्माता-दिग्दर्शक, पटकथा लेखक अशा विविध स्तरांवर एकमेकांना पूरक ठरतं, असं अभिषेक सांगतो. म्हणजे ‘देढ इश्किया’चा जन्म झाला तोही विशालच्याच आग्रहामुळे असे तो सांगतो. माझ्यासाठी ‘इश्किया’ची कथा तेव्हाच संपली होती. खालूजान आणि बब्बन हे भुरटे भोपाळी चोर पळत पूर्वाचलमध्ये पोहोचतात. तिथे त्यांची गाठ कृष्णाशी (विद्या बालन) पडते, पण कृष्णाचं रहस्यमय वागणं त्यांना कोडय़ात टाकतं आणि मग त्याचा माग काढत ‘इश्किया’ची कथा घडते. जेव्हा कृष्णाचं रहस्य त्यांना उलगडतं तिथेच ती कथा संपली होती. माझ्याकडे पुन्हा त्यात नवीन काही सांगण्यासारखं नव्हतं. तरीही विशालचा आग्रह होता की ही कथा पुढे नेता येऊ शकते. मी एखाद्या कथालेखकाला हे काम सांगतो. तेव्हा मला कथा पटली तरच मी चित्रपट करेन, असे सांगितले होते. खरोखरच ‘देढ इश्किया’ची कथा माझ्यासमोर ठेवली गेली तेव्हा त्यात खालूजान आणि बब्बन आहे तसेच होते, पण ते आता दुसरीकडे कुठेतरी आणखी एका वेगळ्याच वातावरणात आणि परिस्थतीत सापडले तर काय होईल.. अशी ती कल्पना होती आणि हे होऊ शकत होतं, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ‘मुन्नाभाई’ चित्रपट मालिकेप्रमाणेच ते होतं. ‘मुन्नाभाई’च्या सिक्वलमध्येही मागच्या कथानकाशी त्याचा काही संबंध नव्हता. उलट, त्याची प्रेयसीच बदलून गेली होती. तसं यातही आहे, हा सिक्वल नाही, कारण खालूजान आणि बब्बन सोडले तर यात मागच्या कथेचा काही संदर्भ नाही.. त्यामुळे हा ‘देढ इश्किया’ आहे.. आणि हे कानाला ऐकायलाही छान वाटतं..
मग ‘देढ इश्किया’मध्ये माधुरी दीक्षित हवी म्हणून बेगम पाराची व्यक्तिरेखा आणण्यात आली की बेगम पारासाठी माधुरीच हवी होती.. असं विचारताच ते दोन्ही अर्थाने ‘हो’ आहे, असं तो म्हणतो. ‘बेगम पारा’ची व्यक्तिरेखा मुळातच कथानकात होती, किंबहुना तिच्यामुळेची पुढची कथा घडते. पण या व्यक्तिरेखेसाठी एक अदब असणारी, उर्दू सहज बोलू शकणारी आणि कथ्थक उत्तम जाणणारी अभिनेत्री हवी होती. मी आणि विशालने मोजून दहा मिनिटेच विचार केला असेल, आमच्या डोक्यात एकच उत्तर होतं, ते म्हणजे माधुरी दीक्षित-नेने. लगोलग विशालने माधुरीला ई-मेलवरून चित्रपटाविषयी कळवले. योगायोग म्हणजे माधुरीने ‘इश्किया’ पाहिला होता आणि तिला तो आावडलाही होता. त्यामुळे तिने या चित्रपटासाठी होकार कळवला. तेव्हापासून मग माधुरीला डोळ्यासमोर ठेवूनच बेगम पाराची व्यक्तिरेखा लिहिली गेली. प्रामाणिकपणे सांगायचं तर ही पूर्ण पटकथा ऐकवल्यानंतर माधुरीने नकार दिला असता तर निश्चितच चित्रपट थांबला असता. कारण मला बेगम पारा पुन्हा नव्याने लिहावी लागली असती, असेही तो मोकळेपणाने सांगतो.
‘देढ इश्किया’ अनेक कारणांमुळे माझ्यासाठी आव्हान होता, असे अभिषेक म्हणतो तेव्हा त्यातलं आव्हान काय? असा प्रश्न आपल्याला पडतो. फार पूर्वी ‘मेरे मेहबूब’, ‘पाकिजा’सारखे चित्रपट होते, ज्यात मुस्लीम समाजातील सभ्यता, संस्कृतीचं चित्रण झालं होतं. त्यानंतर तसे चित्रपट झालेच नाहीत. ‘देढ इश्किया’ची कथा लखनौमधली आहे. तिथल्या मेहमूदाबादच्या बेगम पाराची आहे. त्यामुळे हा चित्रपट करताना मला एक गतकाळातील काल्पनिक वाटणारं पण वास्तव जग पुन्हा जसंच्या तसं उभं करायचं होतं. दिग्दर्शकासाठी हे खूप मोठं आव्हान असतं. मी त्याच्याकडे एक सुवर्णसंधी म्हणून पाहिलं, असे अभिषेकने सांगितलं. पण या सुवर्णसंधीचं सोनं आपल्याला मिळालेल्या कलाकारांमुळेच करता आलं असं तो मानतो. नसिरुद्दीन आणि अर्शदबरोबर एक विश्वासाचं आणि मोकळं नातं आहे. माधुरीबरोबर काम करताना मी पहिले दोन-तीन दिवस उदास होतो. म्हणजे माझ्यासमोर एक सुपरस्टार अभिनेत्री आहे. तिने जो काळ गाजवला तेव्हा मी शाळकरी मुलगा होतो. आज सुभाष घईंसारख्या मात्तबरांबरोबर काम केलेल्या या अभिनेत्रीला भूमिका देताना खरोखरच अर्थपूर्ण असंच ते असेल ना.. हा प्रश्न मला छळत होता. पण, माधुरीचा स्वभाव फार वेगळा आहे. ती स्वत:ला दिग्दर्शकावर सोपवते. काय करायचं आहे, कसं करायचंय, कुठले तपशील जास्त हवेत हे एकदा जाणून घेणं तिच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यामुळे साहजिकच माझ्यावरचं दडपण निघून गेलं आणि मजा आली, असे तो म्हणतो.
‘देढ इश्किया’ हे पूर्णपणे एक नवं विश्व आहे, असं तो सांगतो. लखनौ, मेहमूदाबाद, बेगम पारा आणि तिच्यापर्यंत येऊन पोहोचलेले खालूजान आणि बब्बन. शिवाय, यात एकीकडे माधुरी आणि नसीरजी यांचा जुन्या काळचा प्रणय आहे, तर अर्शद आणि हुमाची आताची घाईघाईने सर्व मिळवू पाहणारी आजची प्रणयी कथा आहे. हे सगळं पाहताना प्रेक्षकांना एका वेगळ्या दुनियेची सैर केल्याची अनुभूती मिळेल आणि तेच माझ्यासाठी माझं मोठं यश आहे.. असं सांगून आपण आता ‘देढ इश्किया’च्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करत आहोत, असे अभिषेक सांगतो.

Story img Loader