मराठी तारकांनी बॉलीवूडची ‘सेलिब्रेटी स्टार’ माधुरी दीक्षित हिला नृत्याची झलक दाखविण्याची विनंती केली आणि माधुरीनेही कोणतेही आढेवेढे न घेता त्या विनंतीला मान देऊन तिच्या ‘देढ इश्किया’ चित्रपटातील ‘हमरी अटरिया पे’ या गाण्यावर आपल्या खास शैलीत नृत्य केले आणि सभागृहात जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला..
निमित्त होते नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या ‘मराठी तारका’ या कार्यक्रमाच्या ५०० व्या प्रयोगाचे. भारती विद्यापीठाचे सेक्रेटरी विश्वजीत कदम यावेळी प्रमुख पाहुणे तर अभिनेत्री श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमात या दोघी अभिनेत्रींच्या गाजलेल्या गाण्यांवर मराठी तारकांनी बहारदार नृत्ये सादर केली.
महेश टिळेकर यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या कार्यक्रमाचे मुंबईसह महाराष्ट्रात, देशात आणि परदेशातही प्रयोग झाले आहेत. मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून काम करणाऱ्या आघाडीच्या तारकांचा या कार्यक्रमात सहभाग आहे.
माधुरीने यावेळी उपस्थित प्रेक्षकांशी मराठीत संवाद साधला आणि मराठी तारकांच्या आग्रहास्तव गाण्यावर नृत्यही केले. श्रीदेवी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि मनोगताच्या अखेरीस ‘जय महाराष्ट्र’म्हणून सगळ्यांचा निरोप घेतला.
वर्षां उसगावकर, किशोरी गोडबोले, हेमांगी कवी, नेहा पेंडसे, केतकी पालव, भार्गवी चिरमुले, क्रांती रेडकर, श्रुती मराठे, प्राजक्ता माळी, सारा श्रवण, संस्कृती बालगुडे, श्वेता शिंदे, अमृता खानविलकर, तेजा देवकर, प्राची पिसाट या मराठी तारकांनी विविध गाण्यांवर नृत्ये सादर केली. त्यांना अभिनेता ललित प्रभाकर, आदिनाथ कोठारे, राघव जुयाल यांनी तसेच बालकलाकार प्रथमेश माने, विशाल जाधव यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे व हितेश पाटील यांचे होते.