अमेरिका सोडून मुंबईत स्थिरस्थावर झाल्यानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये तिसऱ्यांदा पदार्पण करण्यासाठी उत्सुक असलेल्या माधुरी दीक्षित-नेनेचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची तिच्या चाहत्यांबरोबरच इंडस्ट्रीतील लोकही वाट पाहत आहेत. माधुरी सध्या ‘झलक दिखला जा’ या रिअ‍ॅलिटी शोची जज म्हणून पुन्हा चर्चेत आली असली तरी तिसऱ्यांदा हिंदी चित्रपटांमध्ये परतणाऱ्या माधुरीला प्रेक्षक कसे स्वीकारतात?, याकडे चित्रपटकर्मीचे लक्ष आहे. त्यामुळे तिच्या ‘देढ इश्किया’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहिली जाते आहे. परंतु, या चित्रपटात बेगमची मध्यवर्ती भूमिका साकारणारी माधुरी चित्रपटाच्या नुकत्याच आलेल्या पोस्टर्समधून मात्र गायब आहे.
‘इश्किया’ चित्रपट अभिनेत्री विद्या बालनने गाजवला होता. त्याचाच सिक्वल असलेल्या ‘देढ इश्किया’ चित्रपटात नसीरुद्दीन शहा आणि अर्शद वारसी या जोडगोळीबरोबर माधुरी मुख्य भूमिकेत आहे. माधुरीने सध्या दोनच चित्रपट निवडले होते ते म्हणजे ‘गुलाब गँग’ आणि ‘देढ इश्किया’. मात्र, मुंबईत स्थिरस्थावर होऊन दोन वर्ष झाली तरी तिचा अजून एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. ‘गुलाब गँग’ हा चित्रपट पहिल्यापासूनचवादात सापडला आहे. आता निदान ‘देढ इश्किया’त तरी तिच्या अभिनयाची चमक पहायला मिळेल, यासाठी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहिली जाते आहे. परंतु, या चित्रपटाचे पोस्टर्स लागले असून त्यात नासिरुद्दिन आणि अर्शद हीच जोडगोळी दिसते आहे. माधुरी मात्र कुठेच पोस्टरमध्ये नाही. माधुरी या चित्रपटात बेगमच्या भूमिकेत आहे एवढेच सांगण्यात आले आहे पण, तिचा लुक कसा आहे किंवा तिच्या भूमिकेचे वैशिष्टय़ काय. असे सगळेच तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत.

Story img Loader