‘गुलाबी गँग’ चित्रपटाची नायिका माधुरी दिक्षितने चित्रिकरणादरम्यान थक्क करायला लावणारी साहसदृष्ये लीलया केल्याचे तिची साहसदृष्यांची प्रशिक्षक, स्टंट दिग्दर्शक कनिष्का शर्माने म्हटले आहे.
“माधुरीला एका साहसदृष्यामध्ये एकाचा हात पिरगळून एक जोरदार ठोसा लावायचा होता. मी तिच्या बरोबर या दृष्याच्या चित्रिकरणाआधी काही तास सराव केला होता. मात्र, चित्रिकरणाच्या वेळी माधुरीने ते दृष्य सहज पार पाडल्याने मला आश्चर्य वाटले. इतर साहसदृष्ये देखील माधुरीने लीलया पारपाडल्याचे पडद्यावर जाणवते.” असे कनिष्का म्हणाली.
‘गुलाब गँग’ चित्रपटाचे दिग्दर्शक सौमिक सेन यांनी कनिष्काला माधुरीसाठी पडद्यावर वास्तववादी वाटतील अशी दृष्ये डिझाईन करण्यास सांगितली होती. माधुरीला या चित्रपटातील साहसदृष्यांसाठी खास मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिल्याचे दिग्दर्शक सौमिक सेन यांनी सांगितले.
कनिष्काने माधुरीला एक महिना कुंग फु, चाकू चालवण्याचे, लाठीचे आणि क्लोज कॉम्बॅटचे प्रशिक्षण दिल्याचे सांगितले.
माधुरी दिक्षित आणि जुही चावला यांच्या ‘गुलाब गँग’मध्ये प्रमुख भूमिका असून, या चित्रपटाची निर्मिती अभिनव सिन्हा यांनी केली आहे. जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर ७ मार्चला ‘गुलाब गँग’ प्रदर्शित होणार आहे.