बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित कितीही प्रसिद्ध असली तरी तिची मुले अरिन आणि रायन आईच्या या प्रसिद्धीवलयापासून अनभिज्ञ आहेत. त्यांचा तो निरागसपणाच मला जास्त भावतो, असे माधुरीने म्हटले आहे. माधुरीला टीव्हीवर पाहिल्यानंतर तिची मुले आनंदी होतात. तुला टीव्हीवर पाहिले, हेही उत्साहाने सांगतात. दोन वर्षांपूर्वी अमेरिके हून मायदेशी परतलेली माधुरी पती श्रीराम नेने आणि दोन्ही मुलांबरोबर मुंबईत स्थिरस्थावर झाली आहे. ती पुन्हा एकदा ग्लॅमर जगतातही रुळली आहे. मात्र अभिनेत्री म्हणून असलेला आपला करिश्मा अजून मुलांनी पाहिलेला नाही, असे ती सांगते.
‘मला अजूनही कल्पना नाही की मी जे करते ते त्यांना कळते आहे. आजही ते माझ्याकडे धावत येतात आणि सांगतात, आई आम्ही तुला टीव्हीवर पाहिले. माझा छोटा मुलगा कधीतरी टीव्हीवर मला पाहिल्यावर माझ्याकडे येतो आणि हळूच विचारतो की तू खरोखरच एवढी प्रसिद्ध आहेस? त्यांचा तो निरागसपणाच मला जास्त आवडतो’, असे सांगणारी माधुरी सध्या आपल्या दोन चित्रपटांच्या प्रतिक्षेत आहे. ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून चोख भूमिका बजावणाऱ्या माधुरीचे ‘गुलाब गँग’ आणि ‘देढ इश्किया’ हे दोन चित्रपट प्रदर्शित व्हायचे आहेत. आत्ताच्या पिढीचा पाश्चिमात्य नृत्याकडे जास्त ओढा आहे. कारण, ते सहज आत्मसात करता येते. उलट, भारतीय शास्त्रीय नृत्य हे शिकण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. पण, आपल्या नृत्यशैलीत जो आनंदाचा खजिना दडलेला आहे तो या पिढीच्या लक्षातच येत नाही, अशी तक्रार करणाऱ्या माधुरीने शास्त्रीय नृत्य जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Story img Loader