‘झलक दिखला जा’ ही स्पर्धा जिंकण्याचा बहुमान फक्त सर्वोत्तम नर्तकच प्राप्त करू शकतो या मताशी आपण सहमत नसल्याचे  माधुरी दीक्षितने सांगितले. यापूर्वी तीनवेळा ‘झलक दिखला जा’ या ‘डान्स रिअॅलिटी शो’ची परीक्षक राहिलेली माधुरी नव्या पर्वातसुद्धा परीक्षक म्हणून काम पहाणार आहे. ही स्पर्धा जिंकण्यासाठी एखाद्या स्पर्धकाला फक्त सर्वोत्तम नृत्य करून चालणार नाही तर, एक स्पर्धक म्हणूनसुद्धा त्याने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले पाहिजे, असे मत माधुरीने व्यक्त केले. या स्पर्धेदरम्यान एक व्यक्ती म्हणून मी अनेक स्पर्धकांचा प्रवास जवळून अनुभवला आहे. ‘झलक दिखला जा’ मध्ये स्पर्धक कशाप्रकारे दाखल होतात, त्यापैकी काही जण कशा पद्धतीने स्पर्धेचा भाग होतात हे बघताना मला स्वत:ला अनेक गोष्टी समजल्याचे माधुरीने सांगितले. त्यामुळे आजवरच्या अनुभावरून स्पर्धा जिंकण्यासाठी फक्त सर्वोत्तम नृत्यप्रकार सादर करणेच गरजेचे नसून, तुमची नाळ प्रेक्षकांशी जोडली जाणे तितकेच महत्वाचे असल्याचे सांगितले. छोटय़ा पडद्यावर ‘झलक दिखला जा’ची परीक्षक म्हणून माधुरी कायम चर्चेत राहिली आहे. आताही ‘झलक दिखला जा’च्या नव्या पर्वासाठी पहिल्यांदाच  पाश्चिमात्य नृत्यप्रकार शिकणाऱ्या माधुरीने यावेळची आपली छोटय़ा पडद्यावरची ‘झलक’ दमदार असेल, याची पुरेपूर काळजी घेतली आहे.