माधुरीचे नृत्य आणि तिच्या अदा आजही तरुणांच्या काळजाचा ठोका चुकवतात. ‘झलक दिखला जा’सारख्या नृत्यावर आधारित रिअ‍ॅलिटी शोची जज म्हणून काम करणाऱ्या माधुरी दीक्षित-नेनेला स्वत:च्या नृत्यकलेवर विश्वास असला तरी तिचे नृत्यकलेवरचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. नृत्याचे नवनवे प्रकार कोणाकडूनही शिकण्याची तिची तयारी असते आणि म्हणूनच तिच्याबद्दल लोकांच्या मनात असणारे माधुर्य अजूनही टिकून आहे.. हे बोल आहेत ‘झलक दिखला जा’साठी माधुरीला पाश्चिमात्य नृत्याचे धडे देणाऱ्या तरुण कोरिओग्राफर्सचे..
‘झलक दिखला जा’च्या नव्या पर्वाला लवकरच सुरुवात होते आहे. या पर्वात जज म्हणून काम करताना आपले पाश्चिमात्य नृत्याबद्दलचे ज्ञानही तितकेच अचूक असले पाहिजे, या हेतूने माधुरीने या नृत्यप्रकारांचे धडे गिरवायला सुरुवात के ली आहे. या पर्वातला माधुरीचा प्रवेशच या पाश्चिमात्य नृत्य प्रकारांनी होणार आहे. टँगो, फ्लॅमेन्को, सालसासारखे नृत्यप्रकार शिकण्यासाठी माधुरी कसून मेहनत करते आहे. हे प्रकार आत्मसात करणारी माधुरी या पर्वात ‘धूम मचाल’, ‘बेबीडॉल’ यासारख्या गाण्यांवर थिरकताना दिसणार आहे. माधुरीला नृत्याचे धडे देणारा कोरिओग्राफर पुनीत पाठक तिच्या अभ्यासू वृत्तीने आणि विनम्र स्वभावाने हरखून गेला आहे.
‘मी आणि माझे सहकारी दीपक, तुषार आम्ही माधुरीला लॅटिनो नृत्याचे प्रकार शिकवतो आहोत. आमच्याकडून शिकताना त्या नेहमी एकदम आज्ञाधारक शिष्येच्या भूमिकेत असतात. मी चुकले तर मला सतत सांगत राहा, असे त्या सतत आम्हाला सांगत असतात. त्यांच्या या स्वभावामुळेच त्या इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात,’ अशी भावना पुनीतने व्यक्त केली.
शिकत असताना कधी पाय मुरगळला तरी कुठलेही आकांडतांडव न करता एका कोपऱ्यात बसून पाय हलवणे, दुखणे कमी करण्यासाठीचे उपाय करायचे आणि पुन्हा आमच्याबरोबर शिकायला यायचे, इतक्या सहजतेने माधुरीने आपल्याकडून नृत्य शिकून घेतल्याचे पुनीतने सांगितले. माधुरीची नव्या अवतारातली आणि वेगळ्या तऱ्हेचा पदन्यास करतानाची झलक पाहून या वेळी प्रेक्षक नक्की सुखावणार, असे सेटवरच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा