आपली भूमिका अधिकाधिक चांगली आणि प्रत्येक सिनेमागणिक अधिकाधिक कलात्मक पद्धतीने कशी साकारता येईल याचा विचार आजही खूप आवश्यक आहे. सिनेमा हे निश्चितपणे कलात्मक क्षेत्र आहे. व्यक्तिरेखेचे पैलू नेमकेपणाने दाखविण्यासाठी आपण आपल्या गुणवत्तेचा उपयोग करून चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न करण्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. मात्र, सिनेमाक्षेत्राची सर्जनशीलता मान्य करूनही सध्या या व्यवसायाची गरज म्हणून आमचा अभिनय काय झक्कास आहे तुम्ही सिनेमा पहायला या ना.. असे आपण स्वत:च मोठमोठय़ाने सांगत फिरण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी खंत एकेकाळची बॉलिवूडची ‘धक धक’ गर्ल माधुरी दीक्षित हिने व्यक्त केली आहे.
चित्रपटांच्या प्रसिध्दीसाठी कलाकारांना मुलाखती देणे, विविध इव्हेंट्सना जाणे असे सव्यापसव्य करावे लागतात. त्याविषयी अनेक नवे-जुने कलाकर मधूनमधून आपली नाराजी म्हणा किंवा अगतिकता बोलून दाखवत असतात. ‘देढ इश्किया’च्या निमित्ताने नव्वदच्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित कारकिर्दीची एक नवी सुरुवात करते आहे. तिलाही या प्रसिद्धीतंत्राशी जमवून घेताना आपले मत व्यक्त करावेसे वाटले आहे. आज जमाना बदललाय हे खरे. प्रेक्षकांना करमणुकीची अनेक साधनं, अनेक पर्याय उपलब्ध झाले असल्यामुळेच त्यांना आपल्या सिनेमाचे विश्व कसे वेगळे आहे, ते पहायला तुम्ही या, असे ओरडून सांगावे लागते, अशी खंत माधुरीने व्यक्त केली. प्रसिध्दीमाध्यमांना मुलाखती, टीव्ही कार्यक्रमांना लावावी लागणारी हजेरी. आताचे प्रसिध्दीचे तंत्र प्रचंड बदलले असल्याचेही तिने मान्य केले.