‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर हिट चित्रपटाच्या सिक्वलमध्ये धक धक गर्ल माधुरी दीक्षित दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. ‘बाहुबली- द कन्क्लूजन’च्या चित्रीकरणाला नोव्हेंबरमध्ये सुरूवात होणार असून चित्रपटाच्या प्राथमिक कामाला(प्री-पोडक्शन) देखील सुरूवात झाली आहे. ‘बाहुबली’मधील जवळपास सर्वच कलाकार सिक्वलमध्ये पाहायला मिळणार आहेत. पण चित्रपटाला बॉलीवूडचाही मुलामा असावा या उद्देशातून माधुरी दीक्षितचा चित्रपटात समावेश केला जाणार असल्याचे समजते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘बाहुबली- द कन्क्लूजन’मध्ये माधुरी अनुष्का शेट्टीच्या म्हणजेच कुंतला राजवंशच्या राणीची भूमिका साकारणार असल्याचे समजते. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा बाहुबलीचा सहनिर्माता होता. त्यामुळे हिंदी चित्रपट रसिकांकडून ‘बाहुबली- द कन्क्लूजन’ला चांगली पसंती मिळावी यासाठी तो बॉलीवूडमधील कलावतांना या सिक्वलमध्ये घेण्यासाठी उत्सुक आहे.
दरम्यान, दिग्दर्शक एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात खर्चिक चित्रपट ठरला होता. तेलुगू आणि तमीळमध्ये निर्मिती करून ‘बाहुबली’चे हिंदी, मल्याळम आणि फ्रेंच भाषेतही डबिंग करण्यात आले होते. देशात तसेच परदेशातही ‘बाहुबली’ला चांगली पसंती मिळाली होती.