बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि पती डॉ. श्रीराम नेने यांनी कोल्हापूरचे आमदार विनय कोरे यांना सुंदर हत्तीचे पुनर्वसन करण्यासाठी पत्र लिहले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याला बंगळुरू येथील पुनर्वसन केंद्रामध्ये पाठवण्याची विनंती नेने दांपत्याने पत्राद्वारे केली आहे.
वारणा सहकार उद्योग समूहाचे नेते विनय कोरे यांनी २००७ मध्ये सुंदर नावाचा हत्ती जोतिबा देवस्थानाला भेट दिला आहे. काही वर्षे जोतिबा डोंगरावर हा हत्ती वास्तव्याला होता; परंतु काही वेळा सुंदरने चिडलेल्या अवस्थेत दंगा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला वारणानगर येथे हलवण्यात आले.
सद्य:स्थितीत सुंदर याचे वारणानगर येथील शेडमध्ये हाल होत असून त्याच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करून ‘पेटा’ या प्राण्यांच्या हक्कासाठी लढणा-या संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने सुंदर हत्तीला बंगळुरू येथील पुनर्वसन केंद्राकडे पाठवण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या वनखात्याला दिला होता. मात्र, सुंदर हत्तीचे कोणत्याही प्रकारचे हाल येथे होत नसून तो जोतिबा देवस्थानकडेच राहावा अशीही मागणी भाविकांतून होत आहे, तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने सुंदरची देखभाल करणे शक्य नसल्याचे कारण सांगून हा हत्ती पुन्हा विनय कोरे यांच्या वारणा समूहाला परत दिला आहे. आता याप्रकरणी २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
दरम्यान, ‘पेटा’ या संस्थेशी निगडित असणा-या माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती डॉ. राम नेने यांनी थेट विनय कोरे यांनाच पत्र पाठवून सुंदरच्या सुटकेसाठी विनंती केली आहे. आपल्या प्रभावाचा वापर करून सुंदरची सुटका करा, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. आता या पत्राला कोरे काय उत्तर देतात, हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हत्ती सुंदरच्या पुनर्वसनासाठी माधुरीने लिहले पत्र
बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने आणि पती डॉ. श्रीराम नेने यांनी कोल्हापूरचे आमदार विनय कोरे यांना सुंदर हत्तीचे पुनर्वसन करण्यासाठी पत्र लिहले आहे.
First published on: 17-01-2014 at 01:40 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit writes for relocation of elephant sunder