हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम अभिनेत्री माधुरी दीक्षितचे वडिल शंकर दीक्षित यांचे शुक्रवारी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ९१ वर्षीय शंकर दीक्षित यांची प्रकृती गुरुवारी रात्रीच खालावली होती. त्यांच्या तब्येतीची पूर्ण कल्पना डॉक्टरांनी माधुरीच्या घरच्यांना दिली होती. त्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांच्यासमवेत होते. वडिलांच्या तब्येतीची माहिती मिळताच माधुरी ‘झलक दिखला जा’च्या सेटवरून ताबडतोब घरी गेली होती. माधुरी सध्या ‘झलक दिखला जा’ ची मुख्य परीक्षक असून या शोच्या अंतिम भागाचे चित्रिकरण सध्या सुरू आहे.
 आपले वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य दोन्हीबाबत कमालीची काळजी घेणाऱ्या माधुरीने वडिलांच्या निधनाबद्दल माध्यमांसमोर जाहीरपणे बोलणे टाळले आहे. मात्र, ‘बाबांचे जाणे हे दु:खदायक आहे. त्यांची उणीव आम्हाला सर्वाना कायम भासेल यात शंकाच नाही. परंतु, ते त्यांचे जीवन अतिशय उत्तम आणि आनंदाने जगले हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे’, अशी प्रतिक्रिया माधुरीने ट्विटरवर व्यक्त केली आहे.
वडिलांची प्रकृती गंभीर असल्याने माधुरीला गुरुवारीच ‘झलक दिखला जा’च्या चित्रिकरणातून मुक्त करण्यात आले होते. मात्र, शो अंतिम टप्प्यात आला असल्याने त्याच्या उरलेल्या अखेरच्या भागाचे चित्रिकरण शुक्रवारीही करण्यात येणार होते. माधुरीची मानसिक स्थिती लक्षात घेऊन शुक्रवारचे चित्रिकरण रद्द केले असल्याची माहिती ‘कलर्स’कडून देण्यात आली आहे.
या शोच्या अंतिम भागाचे अर्धे चित्रिकरण पार पडले असून त्यात माधुरीचा सहभाग आहे. उरलेल्या भागात माधुरीऐवजी अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिची जागा भरून काढणार असल्याचे समजते. माधुरीच्या गाण्यांवर प्रियांका नृत्य सादर करणार असून माधुरीला अनोखी सलामी देणार असल्याचे वाहिनीकडून सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा