प्रख्यात शास्त्रीय नृत्य सम्राट बिरजू महाराजांबरोबर नृत्याविष्कार सादर करणा-या माधुरी दीक्षितचे म्हणणे आहे की, माझ्यासाठी हा फार मोठा सन्मान आहे, त्याचबरोबर मला प्रचंड दडपण आले आहे.
महान कथक गुरू बिरजू महाराज आणि त्यांची शिष्या माधुरी लवकरच ‘झलक दिखला जा’ या रियालिटी शोमध्ये विशेष जुगलबंदी सादर करणार आहेत. या शोच्या आरंभाची घोषणा करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परीषदेत बोलतांना माधुरी म्हणाली, ‘झलक दिखला जा’ या रियालिटी शोमध्ये बिरजू महाराजांबरोबर नृत्य करण्याची संधी मिळाल्यामुळे मी आनंदित असून, माझ्यासाठी हा फार मोठा सन्मान आहे. परंतु, त्यांच्यासारखे नृत्य जमेल का, या विचाराने मी अस्वस्थ  आहे.
दोघेही पहिल्यांदाच टीव्हीवर एकत्र नृत्याविष्कार सादर करणार आहेत. बिरजू महाराजांनी २००२ मध्ये ‘देवदास’ आणि १९९७ मध्ये ‘दिल तो पागल है’ चित्रपटांमध्ये माधुरीवर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यांचे  नृत्य दिग्दर्शन केले होते.

Story img Loader