तमिळ अभिनेता सिद्धार्थ हा त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत असतो. राजकीय भूमिका असो किंवा आणखी काही सिद्धार्थ सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची मतं ठामपणे मांडत असतो. नुकतंच मदुराई विमानतळावर आलेला अनुभव त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. या विमानतळावर त्याला उगाचच त्रास देण्यात आल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.
तो आणि त्याची वयस्क आई वडील यांना मदुराई विमानतळावरील ‘सीआरपीएफ’ अधिकाऱ्यांनी बरंच तंगवून ठेवल्याचं त्याने निदर्शनास आणून दिलं आहे. याबरोबर तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी योग्य व्यवहार केला नसल्याचंदेखील त्याने सांगितलं आहे. मदुराई विमानतळावरील एक फोटो शेअर करत सिद्धार्थने ही माहिती दिली आहे.
या फोटोमध्ये सिद्धार्थने लिहिलं की, “मदुराई विमानतळावरील ‘सीआरपीएफ’ अधिकाऱ्यांनी आम्हाला तब्बल २० मिनिटं कारण नसताना त्रास दिला, माझ्या वयस्कर आई वडिलांनाही त्यांनी प्रचंड त्रास दिला. आमच्या बॅगमधील नाणी आम्हाला सतत काढायला सांगत होते. इतकंच नव्हे तर ते तिथे आमच्याशी हिंदीत बोलत होते, आम्ही इंग्रजी बोलायची विनंती करूनही ते हिंदीतच बोलत होते. कामं नसलेली ही माणसं उगाचच त्यांच्या अधिकारांचा गैरवापर करत आहेत.”
सिद्धार्थ नुकताचा ‘महा समुद्रम’ या तमिळ आणि तेलुगू चित्रपटात झळकला होता. शिवाय कमल हासन यांच्या ‘इंडियन २’मध्येसुद्धा सिद्धार्थ महत्त्वाची भूमिका साकारत आहे. याबरोबरच सिद्धार्थने हिंदीतही बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. आमिर खानबरोबर ‘रंग दे बसंती’ या चित्रपटातून त्याने हिंदीत पदार्पण केलं होतं. त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.