सामाजिक संवेदना असलेल्या कुणालाही हेलन केलर हे नाव परिचयाचे नाही असे होऊच शकत नाही. अॅनी सुलिव्हान या शिक्षिकेच्या साहाय्याने आपल्या अपंगत्वावर (अंधत्व व कर्णबधीरत्वावर) मात करून हेलन
अॅनीच्या लक्षात येतं की, हेलनचं अपंगत्व हे जसं शारीरिक आहे, त्याहून अधिक घरच्यांकडून तिला जी विशेष वागणूक मिळतेय त्यामुळे तिला मानसिक अपंगत्वही आलंय. हेलनला दिसत नसलं, ऐकू येत नसलं, बोलता येत नसलं तरी तिचा मेंदू तल्लख आहे. जोवर तिला घरच्यांच्या संरक्षक कवचातून आपण तिला बाहेर काढत नाही, तोवर तिच्यावर कोणतेच उपचार काम करणार नाहीत हे ती जाणते. त्यामुळे ती हेलनला पूर्णपणे आपल्या ताब्यात देण्याची विनंती तिच्या घरच्यांना करते. या गोष्टीला ते राजी होत नाहीत. पण अॅनीच्या हट्टामुळे नाइलाजानं ते राजी होतात. मात्र तिला मुदतीची अट घालूनच! खरं तर इतक्या अल्पावधीत हेलनला परावलंबित्वातून बाहेर काढून तिच्या बहुअपंगत्वावर मात करणं आणि तिच्यात संवादकौशल्य रुजवणं शक्यच नसतं. तरीही अॅनी हे आव्हान स्वीकारते.
..पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे.
हेलन केलरनं स्वत: ‘द स्टोरी ऑफ माय लाइफ’ आणि ‘द वर्ल्ड आय लिव्ह इन्’ या आत्मकथनांतून आपल्या संघर्षांची कहाणी लोकांपुढे ठेवली आहे. तिच्यावर नाटक, चित्रपट व मालिकांचीही निर्मिती झालेली आहे. नाटककार वि. वा. शिरवाडकर व सदाशिव अमरापूरकर यांनी हेलनवर लिहिलेलं ‘किमयागार’ हे नाटक वीसेक वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं. नाटकाचा विषय आणि भक्ती बर्वेच्या अभिनयामुळे ते गाजलं होतं. श्री दत्तविजय प्रॉडक्शनने नुकतंच ते पुन्हा रंगमंचावर आणलं आहे. त्याचं दिग्दर्शन केलंय संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी. ‘मंत्रमुग्ध व नजरबंदी करणारा प्रयोग’ असंच त्याचं वर्णन करावं लागेल. हेलनच्या आयुष्याला कलाटणी देणारा पहिला टप्पा हा या नाटकाचा केन्द्रबिंदू. त्यात हेलनपेक्षा तिला घडविणारी शिक्षिका अॅनी हिनं ज्या जिद्दीनं व कष्टपूर्वक हे आव्हान यशस्वी करून दाखवलं, त्याभोवती हे नाटक गुंफलेलं आहे. संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी नाटकाचा हा गाभा अचूक हेरून त्यातलं नाटय़ ताकदीनिशी बाहेर काढलं आहे. अपरिचित पाश्चात्त्य वातावरण आणि अनोळखी पात्रांचं हे नाटक पाहताना सुरुवातीला काही क्षण बाचकल्यासारखं होतं खरं; परंतु नाटकाचा विषय लक्षात आल्यावर ते पकड घेतं आणि पुढे ती जराही ढिली होऊ न देता शेवटचा पडदा पडेपर्यंत प्रेक्षकाला जागीच खिळवून ठेवतं. अर्थात याचं श्रेय नाटकाशी संबंधित प्रत्येक घटकाचं आहे. त्यातही त्या सर्वाना विजयाबाईं (मेहता)सारखं रत्नपारखी नजरेनं एकत्र आणणाऱ्या दिग्दर्शिका संपदा जोगळेकरांचं सर्वाधिक आहे. रंगमंचीय अवकाशाचा कोपरा न् कोपरा त्यांनी यथायोग्यरीत्या वापरला आहे. नाटक आशयापासून किंचितही भटकू नये याची पूर्ण दक्षता त्यांनी घेतली आहे. घटना-प्रसंगांचं काटेकोर नियोजन आणि अपेक्षित परिणाम साधण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते त्यांनी कसलीही कसूर न ठेवता केलं आहे. पात्रनिवडीपासून संगीत, नेपथ्य, वेशभूषा, प्रकाशयोजना अशा सगळ्याचाच सखोल विचार नाटकात जाणवतो. ठोस व्यक्तिरेखाटन, चढत्या भाजणीने प्रयोगातलं नाटय़ खुलवत नेण्याची हातोटी आणि सुरचित तांत्रिकतेचा एकमेळ त्यांनी अप्रतिमरीत्या साधला आहे. त्यांच्या रूपानं एक समर्थ दिग्दर्शिका या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीला लाभली आहे.
१८८७ च्या सुमाराचा काळ आणि तत्कालिन अमेरिकेतील केलर कुटुंबाची वास्तू, बाहेरचं प्रांगण आणि आऊटहाऊस हे सारं सूक्ष्म तपशिलांत संदेश बेंद्रे यांनी उभं केलं आहे. योगेश केळकरांनी योजलेली प्रकाशयोजना केवळ कालनिदर्शकच नाही, तर नाटय़ांतर्गत मूड्सही ती परिणामकारक करते. तीच गोष्ट परिक्षित भातखंडे यांच्या संगीताची. पाश्चात्य सुरावटींचा भारतीय संगीताशी त्यांनी घातलेला मेळ रसपरिपोष करतो. विशेषत: काहीशा गडद नाटय़ाशयात एक नाजूक, हळुवार तरलता जपण्याचं काम त्यांनी केलं आहे. मास्टर बळवंत यांच्या वेशभूषेनं काळ व संस्कृतीची अस्सलता नाटकाला दिली आहे. किशोर पिंगळे व मुकेश गायकवाड यांच्या रंगभूषेचाही त्यात मोलाचा वाटा आहे.
सगळ्या कलावंतांचा परिपक्व अभिनय हे या प्रयोगाचं आणखी एक वैशिष्टय़. विनोद कुलकर्णी यांनी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे संपादक केलर व संवेदनशील, परंतु वास्तववादी दृष्टीचा बाप शैलीदार अभिनयाचा अतिरेक न करता उत्तम साकारला आहे. केटच्या भूमिकेतील पल्लवी वाघ-केळकर यांनी हेलनच्या आईची भळभळती वेदना आणि तिच्या भवितव्यासाठी आकाश-पाताळ एक करणारी स्त्री उत्कटतेनं रंगवली आहे. मनिषा धबडगावकर यांनी केलर कुटुंबाचाच हिस्सा झालेली स्वैपाकीण ईव्हा समजूतदारपणे उभी केली आहे. अनय पाटीलचा छोटा पर्सी अवखळ, चुणचुणीत, तितकाच गोड आहे. पौगंडावस्थेतील जेम्सची अॅनीमधली मुग्ध गुंतणूक (्रल्ल५’५ीेील्ल३) धैर्यशील घोलप यांनी अलवारपणे दाखविली आहे. सर्वात आव्हानात्मक भूमिका आहेत- हेलन आणि अॅनीची! बाह्य़ जगाचं कसलंही भान नसलेल्या मुक्या, बहिऱ्या व मूक हेलनचं अस्तित्व फक्त हाडामांसाचा गोळा इतकंच असतं. तिला भावना, संवेदना जाणवतात; पण त्या केवळ स्पर्शातूनच. तोच फक्त तिचा बाह्य़ जगाशी होणारा संवाद. तशात घरच्यांच्या अनुकंपेच्या वागणुकीमुळे ती नको तितकी हट्टी व आक्रमक झालेली. हे गुंतागुंतीचं व्यक्तित्व साकारण्याचं आव्हान छोटी हेलन साकारणाऱ्या तृष्णिका शिंदेपुढेहोतं. तिनं अत्यंत ताकदीनं ते पेललं आहे. केवळ शारीर हालचालींतूनच नव्हे, तर मुद्राभिनय, देहबोली, वावरणं- या सगळ्यातून हेलनचं व्यक्तिमत्त्व तिनं अप्रतिमपणे साकारलंय. अभिनयाची तिची समज अचंबित करणारी आहे. अर्थात तिच्याहूनही प्रचंड मोठं आव्हान होतं ते अॅनी झालेल्या संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांच्यासमोर! भवतालाचं कसलंही ज्ञान व भान नसणाऱ्या हेलनला हे जग समजावून देण्याचं, त्या जगाशी संवाद साधण्याचं कौशल्य तिच्यात रुजविण्याचं! तेही हेलनच्या जबरदस्त हट्टी व आक्रमक वर्तनाशी आणि केलर कुटुंबीयांच्या अविश्वासाशी सामना करत! आजवर जे अशक्यकोटीतलं मानलं जात होतं, ते शक्यात उतरविण्याचं हे शिवधनुष्य पेलताना होणारी भीषण दमछाक, सोसावे लागणारे पराभवाचे जीवघेणे चटके, भोवतालच्या प्रतिकूलतेशी झगडताना हरवणारा आत्मविश्वास डगमगू न देण्याची कसरत स्वत:मध्ये विजिगिषु वृत्ती जागी ठेवणे.. अशा अनेक पातळ्यांवर अॅनी नाटकात आकारायची होती. मोन्टाजचा वापर करत संपदा जोगळेकर यांनी हा चित्तथरारक संघर्ष समूर्त केला आहे. ‘शब्देविना संवादिजे’ म्हणजे काय, याचा उत्कट प्रत्यय हेलन आणि अॅनी यांच्यातल्या या संघर्षांत येतो आणि नकळत डोळे पाणावतात. संपदा जोगळेकरांच्या संस्मरणीय भूमिकांमध्ये अॅनीचा समावेश करावा लागेल. ‘किमयागार’ हे नाटक एक सशक्त नाटय़ानुभव आणि उत्कट अन् तरल जीवनानुभव देतं, यात तीळमात्र शंका नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा