नाटककार महेश एलकुंचवार यांच्या ‘वाडा चिरेबंदी’ नाटय़त्रयीतील दुसरे पुष्प म्हणजे ‘मग्न तळ्याकाठी’! विदर्भातील धरणगावकर देशपांडे या सरंजामदार कुटुंबाच्या तीन पिढय़ांतील स्थित्यंतरांचं चित्रण एलकुंचवारांनी या नाटय़त्रयीत केलं आहे. त्या अनुषंगानं कालौघात बदलत्या सामाजिक-आर्थिक वास्तवाबरोबरच ढासळत गेलेली कुटुंबव्यवस्था, मूल्यांची पडझड अन् त्याचवेळी माणसाच्या खोल अंतरंगात सुप्तपणे वाहणारा माणूसपणाचा झरा, पारलौकिकाची ओढ अन् आपल्या अस्तित्वाच्या प्रयोजनाबद्दल त्याला पडणारे प्रश्न असा एक प्रदीर्घ पट नाटककाराने या नाटय़त्रयीत मांडला आहे. ‘वाडा चिरेबंदी’च्या दुसऱ्या भागात- ‘मग्न तळ्याकाठी’मध्ये कौटुंबिक विस्कटीनंतर धरणगावकर देशपांडे कुटुंबातील व्यक्तींनी वस्तुस्थितीचा केलेला स्वीकार प्रकर्षांनं दिसतो. अर्थात् काप गेले अन् भोके उरली तरीही हाडीमासी रुजलेली सरंजामशाही वृत्ती आणि सामाजिक उच्चतेची भावना मनातून पूर्णाशाने जात नाही, हे जमीनदार देशपांडय़ांच्या बाबतीत ‘मग्न तळ्याकाठी’मध्येही प्रत्ययाला येते. परंतु काळाबरोबर भवतालात झालेले बदल नाइलाजानं का होईना, या कुटुंबानं स्वीकारले आहेत. त्यात वयाने येणाऱ्या अनुभवातील शहाणपणाचा वाटाही आहेच. ज्याला हे वास्तव पचवणं शक्य झालं नाही, किंवा ज्याला ते स्वीकारायचं नव्हतं, अशा प्रभा आणि चंदूची मात्र यात होरपळ झालेली दिसते.
तात्याजींच्या निधनानंतर त्यांच्या कार्याच्या निमित्तानं एकत्र आलेलं देशपांडे कुटुंब, त्यांच्यातील अंतर्गत कलह आणि परस्पर हितसंबंधांचा झालेला संघर्ष ‘वाडा’मध्ये एलकुंचवारांनी उलगडला होता. ‘मग्न तळ्याकाठी’मध्ये त्यानंतर दहा वर्षांचा काळ लोटला आहे. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. थोरल्या भास्करच्या मुलांची (रंजू आणि पराग) लग्नं व्हायची आहेत. त्याकरता मुंबईहून भास्करचा धाकटा भाऊ सुधीर, त्याची बायको अंजली आणि अमेरिकेहून परतलेला मुलगा अभय धरणगावी येतात. पण पराग मात्र त्यांच्याशी उभा दावा धरून बसतो. त्यांचं येणं त्याला रुचलेलं नाही. सुधीरने तात्याजींच्या कार्यासाठी आलेला असताना परागला शिक्षणासाठी मुंबईला घेऊन जातो म्हणून म्हटलं होतं. गावात वाया चाललेला पराग काकाच्या या आश्वासनानं सुखावलेला असतो. मात्र, परागच्या संगतीत आपला अभयही बिघडेल म्हणून अंजलीनं त्यात मोडता घालते. अभयही परागला मुंबईला न्यायला विरोध करतो. त्यामुळे परागचं मुंबईला जायचं स्वप्न भंगलेलं असतं. तो राग त्याच्या मनात साचत आता त्याचं कडूजार विष बनलेलं असतं. सुधीरचं आपल्या घरातल्या लग्नकार्याकरता येणं त्याला म्हणूनच फारसं रुचलेलं नसतं.
भास्कर आणि वहिनीनं (परागची आई) मात्र त्यांना आवर्जून बोलावलेलं असतं. मधल्या काळात परागनं आपल्या बेधडक कर्तृत्वानं (त्याचे धंदे अवैध असले तरी) धरणगावातल्या घराला बरे दिवस आणलेले असतात. परागचं कर्तृत्व एवढंच सीमित नसतं, तर गावात एका विधवेबरोबरही त्याचे राजरोस संबंध असतात. परागच्या आई-वडिलांना त्याचे हे कारनामे पसंत नसले तरी कसा का असेना, त्यानेच घराला बरे दिवस आणले म्हणताना त्यांची त्याच्यापुढे ब्र काढण्याची शामत नसते. त्याचं लग्न करून दिलं की तो आपोआप ताळ्यावर येईल, या आशेवर त्यांनी त्याच्याकरता ही लग्नाची बेडी योजलेली असते. परागचं हे असं, तर रंजूची दुसरीच तऱ्हा. दहा वर्षांपूर्वी शिकवणी घेणाऱ्या मास्तरांबरोबरच पळून गेलेल्या रंजूचा गावभर बभ्रा झालेला असल्यानं तिची कुठं सोयरीक जुळणं तसं अशक्यच असतं. मोठय़ा मुश्कीलीनं हुंडय़ाच्या आमिषावर एक नवरा मुलगा आता राजी झालेला असतो. तिला एकदाची उजवली की आपण आपल्या जबाबदारीतून सुटलो असं घरच्यांना वाटत असतं.
..तर अशा या दोन लग्नांकरता म्हणून मुंबईहून सुधीर आणि कंपनी आलेली आहे. पण परागचं तुच्छतावादी वागणं बघता आपण लग्नाला आलो नसतो तर बरं झालं असतं असं त्यांना वाटतं.
काय होतं पुढे..?
हाच ‘मग्न तळ्याकाठी’चा विषय आहे.
नाटककार महेश एलकुंचवार यांनी धरणगावकर देशपांडे कुटुंबाचे विरलेले नातेसंबंध, त्यांतले पेच, अविश्वासाच्या निरगाठी, तरीही त्यांच्यात टिकून असलेला अंतरीचा ओलावा, प्रत्येकाच्याच मनातल्या दुखऱ्या नसा, त्यांचं स्पष्ट-अस्पष्ट प्रकटीकरण अन् विरेचन.. आणि या सगळ्यापल्याड मानवी अस्तित्वासंबंधीचं प्रभा व अभयच्या मनात चाललेलं गूढ, गहिरं चिंतन.. हे सारं इतक्या सूक्ष्म तपशिलांनिशी या नाटकात मांडलेलं आहे की अक्षरश: स्तिमितच व्हायला होतं. ‘मग्न तळ्याकाठी’चं वैशिष्टय़ म्हणजे ‘वाडा चिरेबंदी’ने निर्माण केलेल्या सरंजामशाही ब्राह्मणी कुटुंबाच्या कालौघातील पतनाचा आलेख यात अधिकच रुंदावत जातो. उगमस्थानी प्रचंड आवेगानं उसळत वाहणारी नदी जशी मध्यावर पठारी भागात आल्यावर स्थिरावते, शांत होते, तद्वत ‘वाडा’च्या या दुसऱ्या भागात देशपांडे कुटुंबाचं धारेला लागणं काहीसं स्थिरावल्याचं दिसतं. आजूबाजूला मोठय़ा प्रमाणावर घडत असलेला सार्वत्रिक ऱ्हास त्यांच्याही वाटय़ाला आलेला असला, तरी आता त्याकडे काहीसं तटस्थभावानं पाहणं त्यांना साध्य झालंय. म्हणूनच वहिनी, अंजली, अभय, पराग ही पात्रं जगण्यातल्या आधीव्याधींच्या पल्याड चाचपडत का होईना, पाहताना दिसतात. पुढच्या पिढीतला अभय तर पृथ्वीतलावरील माणसाच्या अस्तित्वाचं प्रयोजन काय, हे शोधू पाहतोय.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी हा प्रशस्त कौटुंबिक-सामाजिक पट त्यातल्या समग्र ताण्याबाण्यांनिशी अत्यंत प्रभावीरीत्या मंचित केलेला आहे. प्रत्येक पात्राचे बाह्य़ वर्तन-व्यवहार तसंच त्यांचे अंतर्गत मनोव्यापार, त्यातल्या मूक, विलोल हालचाली कधी प्रकट, तर कधी बोलक्या नि:शब्दतेतून प्रत्ययकारीतेनं व्यक्त होतील असं त्यांनी पाहिलं आहे. सगळ्याच पात्रांचं दिसणं आणि असणं त्यांनी अस्सल केलं आहे. विशेषत: त्यांच्या गेश्चर-पोश्चरचा त्यांनी खूप बारकाईनं विचार केल्याचं जाणवतं. पात्रांचे संवादोच्चार, त्यांची देहबोली, त्यातून ध्वनित होणारे वा काही वेळा अस्फुट, संदिग्ध राहणारे संदर्भ, त्यातून आपल्याला प्रेक्षकांपर्यंत जे पोचवायचंय, त्याला त्यांनी आणलेलं विलक्षण टोकदारपण- हे सारं जाणीवपूर्वक प्रतििबबित होत राहील याची दक्षता चंद्रकांत कुलकर्णी यांनी घेतली आहे. तीन पिढय़ांच्या आया आपापल्या मुलांच्या भविष्याच्या काळजीनं कासावीस होत बाहेरच्या दिशेनं पाहताहेत, या नोटवर नाटक चरमबिंदूला नेत दिग्दर्शकानं त्याला एक आगळी उंची प्राप्त करून दिली आहे.
प्रदीप मुळ्ये यांनी उभ्या केलेल्या अनेकखणी वाडय़ात ओसरीवरील वाशाला लावलेल्या टय़ुबलाइटपासून कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या दर्शनी भागात लावलेल्या तसबिरींपर्यंत असंख्य बारीकसारीक तपशील अस्सलतेनं भरलेले आहेत. काळाचे संदर्भ आणि नाटय़ांतर्गत विविध मूड्स रवि-रसिक यांनी प्रकाशयोजनेतून मूर्त केले आहेत. आनंद मोडक आणि राहुल रानडे यांनी दिवस-रात्रीचे विविध प्रहर, त्यावेळचा वाडय़ाचा भवताल तसंच वाडय़ातील माणसांच्या भावनांचे कल्लोळ पाश्र्वसंगीतातून उठावदार केले आहेत. शरद सावंत यांच्या रंगभूषेनं आणि प्रतिमा जोशी-भाग्यश्री जाधव द्वयीच्या वेशभूषेनं ऐंशीच्या दशकातले सरंजामशाही ब्राह्मणी कुटुंबातले वास्तव मूर्तिमंत आकारले आहे.
‘वाडा चिरेबंदी’तील मूळच्या कलाकारांखेरीज आणखीन तीन कलाकारांची ‘मग्न तळ्याकाठी’त भर पडली आहे. ‘वाडा’तील पात्रांची वय दहा वर्षांनी वाढली आहेत, त्याचसोबत त्यांच्या अनुभवाचा पैसही विस्तारला आहे. त्यातून त्यांच्या वर्तनात, वृत्तीत झालेला फरक दृष्टीस पडतो. फक्त बदल झाला नाहीए तो धरणगावकर देशपांडय़ांच्या घरातल्या पुरुषांच्या पीळामध्ये! प्रभामध्येही तो आहे. अपवाद : धाकटय़ा चंदूचा. अगदी अमेरिकेत वास्तव्य करून आलेल्या अभयमध्येही हा पीळ जाणवतो. प्रभा आणि चंदूच्या परवडीला त्यांचे स्वभाव कारण ठरले. एकीचा मानीपणा, तर दुसऱ्याचा सदा पडतं घेण्याचा! त्यापायी त्यांची आयुष्यं भरकटली. या सर्वात वेगळेपणानं लक्ष वेधून घेते ती घरात आलेली नवी सून- नंदिनी. तिचं नैतिक तेज आयुष्यात भरकटलेल्या परागलाही काहीसं ताळ्यावर आणतं.
घरातली आपली सद्दी संपलीय हे जाणून असलेला ‘नरो वा कुंजरोवा’ पवित्रा घेणारा, बोटचेपेपणा अंगात मुरलेला, काहीच अंगाला लावून न घेण्याची वृत्ती असणारा, मात्र परागच्या अवैध धंद्यांनी मनात दाटलेल्या अनामिक भीतीनं ग्रस्त असलेला थोरला भास्कर- वैभव मांगले यांनी सर्वार्थानं जिवंत केला आहे. निवेदिता सराफ यांनी मोठय़ा वहिनीचं कर्तेपण, समंजसपणा, मुलांच्या चिंतेनं आतून पोखरलेलं मन या भावावस्था उत्कटपणे व्यक्त केल्या आहेत. अंजलीचं अभयच्या भवितव्याच्या चिंतेनं आतल्या आत घुसमटणं, नवऱ्याबद्दलची अव्यक्त तक्रार, परागबद्दलची आपुलकी, घराची एकी टिकवण्याची तिची धडपड हे सारं पौर्णिमा मनोहरांनी उत्तमरीत्या पोहोचविलं आहे. प्रसाद ओक यांनी सुधीरचा सटक माथा, परागच्या तुसडय़ा वागण्यानं स्वत:च्याच घरात आलेलं एक प्रकारचं चोरटेपण, त्याची आपमतलबी वृत्ती यथार्थपणे दाखविली आहे. परागचं शुष्क कोरडेपण, कलंदर बेफिकिरी, आपल्या गैरकृत्यांचं सतत मानगुटीवर बसलेलं सावट, अभयबद्दल सुरुवातीस वाटणारं परकेपण संपल्यावर त्याच्याशी जुळलेलं त्याचं निर्भर नातं, नंदिनीच्या बंडखोर वर्तनाने त्याच्यातल्या स्त्रण पुरुषाचा झालेला पराभव सहजी स्वीकारणं.. इतका मोठा भूमिकेचा आवाका चिन्मय मांडलेकर यांनी लीलया पेलला आहे. नेहा जोशी यांनी ‘वाडा’तल्या रंजूच्या उच्छृंखलपणात कसलाच बदल झालेला नाही, हे यात तितक्याच उठवळपणे दाखवलं आहे. प्रभाची विकल, मनोरुग्णाईत अवस्था प्रतिमा जोशींनी ताकदीनं अभिव्यक्त केली आहे. चंदूला लागलेली आध्यात्मिक ओढ, आईच्या मायेच्या बेडीमुले झालेली त्याची कुचंबणा दीपक कदम यांनी मूर्तिमंत केली आहे. आपल्या अस्तित्वाचं प्रयोजन धुंडाळण्याची आस लागलेला, सिंथियाच्या प्रेमात पडलेला, पण तिला पत्नी म्हणून स्वीकारण्याबाबतीत साशंक असलेला, आई-वडिलांच्या व्यवहारी वृत्तीला उबगलेला आणि परागच्या सहवासात पुन्हा माणसात आलेला अभय- सिद्धार्थ चांदेकर यांनी वास्तवदर्शी वठवला आहे. नंदिनीचं अबोल, परंतु ठाम व्यक्तिमत्त्व, तिची सोशीकता, आयुष्य समोर येईल तसा त्याचा निमुट स्वीकार करणारी, बाहेरख्याली आणि अवैध धंदे करणाऱ्या नवऱ्याचं प्राक्तन मुकाटपणे स्वीकारूनही त्याला आपल्या प्रखर नैतिकतेच्या बळावर ताळ्यावर आणणारी नववधू राजश्री ठाकूर यांनी लक्षवेधी केली आहे. भारती पाटील यांनीही उतारवयातलं मायेनं ओथंबलेलं आईपण गहन-गहिरं केलं आहे.
आजच्या व्यक्तिकेंद्री जगण्यात स्वत:ला हरवून बसलेल्या या जगात ‘मग्न तळ्याकाठी’ हे एक प्रगल्भ, परिपक्व जीवनानुभव देणारं नाटक आहे. प्रत्येकानं एकदा तरी ते आवर्जून अनुभवायलाच हवं.
रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा