अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरचा गणपती हा दरवर्षीच आकर्षणाचा विषय ठरतो. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी कला, समाजिक, राजकीय क्षेत्रातली अनेक मान्यवर मंडळी नाना पाटेकर यांच्या घरी भेट देतात. घरी येणाऱ्या प्रत्येकाचं नाना आणि त्यांचे कुटुंबीय जातीने आदरातिथ्य करतात. नुकतीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी नाना यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतलेच, पण त्याचसोबत गप्पा गोष्टी करत त्यांच्यासोबत वेळही घालवला.
आणखी वाचा : अभिनेत्री ऋतुजा बागवेने लालबागच्या राजाला अर्पण केला ‘खास’ प्रसाद, व्हिडीओ व्हायरल
एकनाथ शिंदे अभिनेते नाना पाटेकर यांच्या सिंहगड पायथ्याशी असलेल्या डोणजे येथीस फार्म हाऊसवर गेले. यावेळी त्यांनी नाना पाटेकर यांच्या घरी स्थापना करण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. तसेच एकनाथ शिंदे यांनी नाना यांच्या घरी जेवणाचाही आनंद घेतला. नानांच्या बागेत त्यांनी वृक्षारोपणं केलं आणि नानांशी मनसोक्त गप्पा मारल्या. नानांनी स्वतःच्या हाताने मुख्यमंत्र्यांसाठी चुलीवरचे पिठलं केले होते. सुमारे सव्वा तास ते नाना यांच्या फाहाऊसवर रमले होते.
मुख्यमंत्र्यांच्याबरोबर यावेळी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री विजय शिवतारे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुरातत्वचे सहसंचालक विलास वाहने, उपवनसंरक्षक राहुल पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील अनेक सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेतले. त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचीही आरती केली. यानंतर मुख्यमंत्री अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले.