Rakhi Sawant India’s Got Latent Case: समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोवरून सुरू असलेल्या वादाला आता एक नवीन वळण मिळाले असून, या प्रकरणी आता अभिनेत्री राखी सावंतला महाराष्ट्र सायबर सेलने समन्स पाठवले आहे. त्यामुळे राखी सावंतला २७ फेब्रुवारी रोजी तिचा जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्र सायबर सेलने आशिष चंचलानी आणि रणवीर इलाहाबादिया यांना त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी २४ फेब्रुवारी रोजी कार्यालयात बोलावले आहे. दुसरीकडे ‘इंडियाज गॉट लेटेंट’चा प्रमुख समय रैना यालाही दोन समन्स पाठवण्यात आले आहेत. पण आतापर्यंत तो पोलिसांसमोर हजर झालेला नाही. समय रैना देशाबाहेर असल्याने त्याने १७ मार्चपर्यंत वेळ मागितला आहे परंतु महाराष्ट्र सायबर सेलने त्याला वेळ देण्यास नकार दिला आहे.
या प्रकरणावर बोलताना महाराष्ट्र सायबर सेलचे महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी एएनआयला सांगितले की, “महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंत यांना समन्स पाठवले आहे. राखी सावंत यांना महाराष्ट्र सायबरने २७ फेब्रुवारी रोजी त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. आशिष चंचलानी आणि रणवीर इलाहाबादिया यांनाही २४ फेब्रुवारी रोजी त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. समय रैनाने यासाठी १७ मार्चपर्यंतचा वेळ मागितला होता, पण, महाराष्ट्र सायबर सेलने याला नकार दिला आहे.”
राखी सावंतला का समन्स?
बॉलिवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत इंडियाज गॉट लेटेंटच्या एका भागात पाहुणी म्हणून आली होती. यापूर्वी, महाराष्ट्र सायबर सेल इंडियाज गॉट लेटेंटच्या सर्व भागांची चौकशी करत असल्याची माहिती समोर आली होती आणि शोमध्ये सहभागी असलेल्या सर्व पाहुण्यांना चौकशीसाठी बोलावू शकते. म्हणूनच राखी सावंतला समन्स पाठवण्यात आले आहे. भारती सिंगने तिचा पती हर्ष लिंबाचियासोबत या शोच्या एका भागात सहभाग नोंदवला होता, त्यामुळे पोलीस त्यांनाही चौकशीसाठी बोलावू शकतात.
काय आहे वाद?
समय रैना युट्यूबवर इंडियाज गॉट लेटेंट नावाचा एक शो चालवतो. ज्यामध्ये अनेक मोठे टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्स देखील पाहुणे म्हणून दिसले होते. या शोच्या एका भागात रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि अपूर्व मखीजा पाहुणे म्हणून आले होते. ते सर्व प्रसिद्ध युट्यूबर्स आहेत. या शो दरम्यान, रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला तिच्या पालकांबद्दल एक अश्लील प्रश्न विचारला होता. याशिवाय, त्याने २ कोटी रुपयांच्या बदल्यात अश्लील कृत्य करण्याची ऑफरही दिली. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि लोकांनी रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनावर टीका करायला सुरुवात केली. हे प्रकरण वाढत गेले आणि अनेक राज्यांमध्ये त्याविरुद्ध तक्रारी दाखल झाल्या.