११ वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडणारा आणि एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला अभिनेता सलमान खान याच्याविरुद्धच्या फेरसुनावणीच्या खटल्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास परवानगी मागणारा प्रस्ताव खटल्यातील सरकारी वकिलांनी राज्याच्या न्याय व विधी विभागाकडे पाठवला आहे. मात्र त्याबाबत न्याय व विधी विभागाकडून अद्याप काहीच कळविण्यात आले नसल्याचे मंगळवारी न्यायालयाला सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने १२ फेब्रुवारीपर्यंत प्रकरणाची सुनावणी तहकूब करीत त्या वेळी याबाबत कळविण्याचे सरकारी वकिलांना आदेश दिले आहेत.
फेरसुनावणीच्या निर्णयाला आव्हान देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे करण्यात आल्याची माहिती यापूर्वी सरकारी वकिलांनी न्यायालयाला दिली होती. त्यानंतर अद्याप पत्राला उत्तर देण्यात आले नसून सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे दोन वेळ मागून घेतला. तर सलमानच्या वतीने या फेरखटल्याची सुनावणी झटपट घेण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली होती. तत्पूर्वी, सलमानविरुद्धच्या फेरखटल्यात सरकारी पक्षातर्फे ६४ साक्षीदार तपासण्यात येतील असे सांगितले.

Story img Loader