एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. सलग दहा दिवस सुरु असलेलं हे राजकीय नाट्य मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संपलं आहे. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी २९ जून रोजी जनतेशी संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. त्यानंतर याबाबत सोशल मीडियाद्वारे लोकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. फक्त सामान्य लोक नव्हे तर कलाकार मंडळी देखील आपलं मत मांडताना दिसत आहेत.
आणखी वाचा – Viral: ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…’ , किशोर कदमांची राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी कविता
मराठीमधील प्रसिद्ध अभिनेता-लेखक हेमंत ढोमेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भावनिक ट्विट केलं आहे. त्याने हे ट्विट करताच अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आहे हे कळताच हेमंत ढोमेला देखील दुःख झालं. आणि त्याने आपलं मत मांडत उद्धव ठाकरे यांचे आभार देखील मानले आहेत.
काय म्हणाला हेमंत ढोमे?
“धन्यवाद उद्धव ठाकरे. तुमचा संपुर्ण प्रवास सहजसुंदर आणि निर्मळ होता. करोनाकाळात आपण कुटुंबप्रमुख म्हणून आमची काळजी घेतली. आज आपल्याला मुख्यमंत्री म्हणून अलविदा म्हणताना खरंच वाईट वाटतंय. धन्यवाद उद्धव ठाकरे साहेब! तुम्ही कायम लक्षात राहणार…” अशा प्रकारचं ट्विट हेमंतने केलं आहे.
आणखी वाचा – “हिंदूंनो जागे व्हा…”; उदयपूर हत्या प्रकरणाबाबत शरद पोंक्षे यांनी शेअर केलेली पोस्ट चर्चेत
त्याने ट्विट केल्यानंतर एका युजरने म्हटलं की, “अखेर महाराष्ट्राने एक साधा, सरळ, विनम्र आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला. लव्ह यु उद्धवजी ठाकरे साहेब.” तर दुसऱ्या युजरने म्हटलं की, “उद्धव ठाकरे पुन्हा भरारी घेतील यात शंका नाही. साहेब खूप प्रेम.” उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर सोशल मीडियाद्वारे लोकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे.