रेश्मा राईकवार

कलेची दैवी देणगी अंगी असणं हे पुरेसं होत नाही. त्या कलेचा उपयोग कसा आणि कशासाठी करून घ्यायचा? याची दिशाही सापडायला हवी. आणि एकदा का ती दिशा सापडली की वाटेल ती आव्हानं-अडचणी येवोत आपल्या कलेशी आणि तत्त्वांशी प्रामाणिक राहत वाटचाल करणारा कलाकार त्याच्याही नकळत खूप मोठं कार्य घडवत जातो. ‘महाराष्ट्र शाहीर’ पाहताना शाहीर कृष्णराव साबळे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि त्यानंतरही लोककलेच्या माध्यमातून समाजाच्या वैचारिक जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न किती महत्त्वाचे होते याची पुन्हा नव्याने जाणीव झाल्याशिवाय राहत नाही.

south superstar ram charan goes barefoot heads to lucknow video viral
Video: दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण अनवाणी पायाने पोहोचला एअरपोर्टवर, ४१ दिवस करणार ब्रह्मचर्याचं पालन; काय असतं जाणून घ्या…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
A young man attempted suicide from the employees building in the Police Commissionerate area
पोलिस आयुक्तालय परिसरातील कर्मचाऱ्यांच्या इमारतीवरून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल

एखाद्या कर्तबगार व्यक्तीचा जीवनप्रवास उलगडून सांगणं एवढाच चरित्रपटाचा उद्देश मर्यादित नसतो. त्या व्यक्तीच्या अनुषंगाने तत्कालीन सामाजिक-आर्थिक, राजकीय, कौटुंबिक घटना, त्यांचे परिणाम, बदल अशा कितीतरी पैलूंवर भाष्य करण्याची संधी चरित्रात्मक आशयातून मिळते. तशी संधी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी महाराष्ट्र शाहीरह्णची मांडणी करताना अनेक ठिकाणी घेतली आहे. त्यामुळे आईच्या भीतीपोटी गाणं मनातच दडवणारा कृष्णा ते शाहीर कृष्णराव साबळे या व्यक्तिमत्त्वापर्यंतचा प्रवास सांगत असताना त्यांच्या अवतीभवती असलेल्या व्यक्तींचा आणि घटकांचा त्यांच्या विचारांवर, कृतीवर कसा परिणाम होत गेला हेही दिग्दर्शकाने कुठलाही आडपडदा न ठेवता सांगण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: शाहीर आणि त्यांची आई, शाहीर आणि पत्नी भानुमती या दोन नात्यांमधून तत्कालीन सामाजिक – कौटुंबिक विचारसरणीचे, व्यवस्थेचे अनेक कंगोरे लक्षात येतात.

भजन गाऊन कोणाचं पोट भरणार नाही, हा स्वत:च्या संसारातील कडवट अनुभव पचवू न शकलेली कृष्णाची आई त्याने मात्र नुसतं गाणं गात फिरू नये. शिक्षण घेऊन चांगली नोकरी करावी, घरदार सावरावं या हट्टापोटी त्याला गाणं गाण्यावर बंदी आणते. त्याचं गाण्याचं वेड उतरत नाही आहे हे लक्षात आल्यावर त्याची रवानगी थेट मामाकडे अंमळनेरला केली जाते. मनातून जाता न जाणाऱ्या या गाण्याचं करायचं काय? याचं योग्य उत्तर खरं तर शाहिरांना लहानपणी अंमळनेरला आल्या आल्या सानेगुरुजींकडून मिळतं. मात्र लहानपण कितीही नाही म्हटलं तरी ते मोठयांच्या ताब्यात असतं. त्यामुळे सानेगुरुजी, गाडगेबाबा यांचा सहवास, आशीर्वाद मिळूनही कृष्णाचं गाणं पुन्हा एकदा आईच्या इच्छेआड दडून राहतं. ऐन तारुण्यात पुन्हा एकदा सानेगुरुजींचा झालेला परीसस्पर्श, कृष्णाचं गाणं ते शाहिराचं गाणं घडवण्यापर्यंतचा प्रवास, भानुमती या हुशार-विचारी तरुण कवयित्रीचं त्यांच्या आयुष्यात येणं हीसुद्धा क्रांतिकारी घटना ठरली. शाहिरांचा आवाज आणि आपले शब्द हेच ध्येय बाळगून असलेल्या भानुमतीचं स्वातंत्र्यपूर्व काळात घरातून पळून जाऊन शाहिरांना त्यांच्या गावी गाठणं, घरातल्यांना काहीही न सांगता शाहिरांनी ऐन कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भानुमतीशी केलेला विवाह, त्यानंतर खऱ्या अर्थाने भानुमती यांच्या शब्दांशी शाहिरांचे जुळलेले सूर असा देशसेवेचे व्यापक उद्दिष्ट घेऊन सुरू झालेला त्यांचा संसार या घटना खूप काही सांगून जाणाऱ्या आहेत.

प्रेरणादायी व्यक्ती कायम आपल्या आजूबाजूला असतात, मात्र स्वातंत्र्यासाठी इतरांनी झगडावं. आम्ही दिल्या परिस्थितीत खूश आहोत अशी झापडं लावून राहते तर शाहीर साबळे हे इतर चारचौघांसारखे गिरणी कामगार म्हणून मुंबईत कुठेतरी जगले असते. मात्र थोरामोठय़ांचे विचार कृतीत आणण्यासाठी शाहिरांनी प्रयत्न केले आणि त्यांना भानुमती यांचीही साथ कशा पद्धतीने लाभली हे मांडतानाही कलाकार आणि व्यक्ती म्हणून या दोघांच्या नात्यातील ताणेबाणेही दिग्दर्शकाने तितक्याच स्पष्टपणे मांडले आहेत. हा वैयक्तिक प्रवास खूप काही सांगणारा असला तरी त्या नादात कुठेतरी शाहिरांचा लोककलाकार म्हणून झालेला प्रवास काही महत्त्वाचे प्रसंग, व्यक्ती आणि दौरे यांचा झरझर उल्लेख करत थोडा वेगवान झाला आहे असं वाटतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला त्यांचा सहभाग, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीने मराठी माणसाला जागं करण्यासाठी नाटकाच्या माध्यमातून शाहिरांनी केलेले प्रयत्न आणि त्याला राजकीय रंग लाभल्याचे लक्षात आल्यानंतर त्यापासून दूर झालेले शाहीर अशा निवडक घटनांमधून शाहिरांचे अंतरंग उलगडले आहे. मोजक्या पण दमदार व्यक्तिरेखा आणि त्यानुसार निवडलेले चोख कलाकार यामुळे अभिनय आणि आशय दोन्हींमध्ये एकरूपता साधता आली आहे. तो काळही उत्तम उभा राहिला आहे. एक-दोन दृश्यांतली अतिरेकी मांडणी थोडी खटकणारी आहे, मात्र मुळातच चित्रपटातून जे मांडायचे आहे त्याबद्दल दिग्दर्शकाच्या मनात असलेली स्पष्टता पडद्यावरही मांडणीतून पुरेपूर उमटली असल्याने इतर खटकणाऱ्या बाबी जाणवत नाहीत.

मुळातच शाहिरांबरोबर असलेल्या निवडक व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले असल्याने कलाकारही मोजकेच आणि भूमिकेची समज असलेले आहेत. अभिनेता अंकुश चौधरी याने पहिल्यांदाच चरित्रात्मक भूमिका साकारली आहे. त्याने आपल्या सहजशैलीत शाहिरांच्या भूमिकेला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. शाहिरांच्या लूकसाठी घेतलेली मेहनत असो वा अन्य कुठल्याही गोष्टीचं दडपण न बाळगता त्याने ही भूमिका केली आहे. अभिनेत्री सनानेही भानुमतीच्या मनातील कलाकार की पत्नी हे द्वंद्व, त्यांच्या व्यक्तिरेखेतील भावनिक कंगोरे उत्तम रंगवले आहेत. शाहिरांच्या आईची भूमिका साकारणारी शुभांगी सदावर्ते, शाहिरांचे सहकारी अगदी राजा मयेकरांच्या भूमिकेसाठीही केलेली उत्तम कलाकारांची निवड सार्थ ठरली आहे. ‘गाऊ नको कृष्णा’, ‘बहरला हा मधुमास नवा’ या नव्या गाण्यांबरोबरच शाहिरांची लोकप्रिय गाणी, पोवाडे हा सगळाच भाग श्रवणीय आहे. संगीतकार अजय-अतुल यांच्या परिचित संगीतशैलीपेक्षा या चित्रपटातील गाणी वेगळी झाली आहेत. काही प्रसंगात अजय-अतुल यांचे परिचित संगीत ऐकायला मिळते, मात्र त्याचा फारसा परिणाम महत्त्वाच्या गाण्यांवर झालेला नाही. थोडया उणिवा बाजूला ठेवल्या तर शाहिरांच्या अंतरंगात डोकावण्याची संधी देत तत्कालीन महत्त्वाच्या घटनांवर बोलणारा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चरित्रपट वेगळा वाटतो.

महाराष्ट्र शाहीर

दिग्दर्शक – केदार शिंदे

कलाकार – अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, शेखर फडके, अश्विनी महांगडे, शुभांगी सदावर्ते, दुष्यंत वाघ, अमित डोलावत, निर्मिती सावंत, अतुल काळे.