सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित १२व्या महाराष्ट्र राज्य बालनाटय़ स्पर्धेच्या नागपूर विभागीय प्राथमिक फेरीला आज प्रारंभ झाला. जाहीर करण्यात आलेल्या चार नाटकांपैकी तीन नाटके आज सादर करण्यात आली.
नागपूर नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकासे व किशोर आयलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पध्रेला सुरुवात झाली. संजय जीवने लिखित ‘भट्टी’ हे नाटक सुरुवातीला सादर करण्यात आले. सुरेंद्र वानखडे लिखित ‘फुटपाथ’ या नाटकात रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या व आपले आयुष्य कंठणाऱ्या बालकांच्या जीवनावर प्रकाश टाकला होता. अत्यंत अडचणीत जगणाऱ्या, लहान लहान सुखांना व आनंदांनाही वंचित राहणाऱ्या या मुलांच्या भावविश्वावर भाष्य केले होते.
कनक अंबादे व भीमराव चव्हाण यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाचे सादरीकरण आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, गडचिरोलीच्या वतीने करण्यात आले. कौशिक पाटील, आयुष हिरेखण, सांची तेलंग, वैशाली गायकवाड, इशांत धाबर्डे, गौरी गोस्वामी, नंदिनी नहाते, प्रतिक भगत, गुरुदत्त बांगट, भाग्यश्री उके, सूरत सहारे, वृषाली चव्हाण यांनी विविध भूमिका निभावल्या. नयन थूल यांनी प्रकाशयोजना, सोनू बाटे यांनी नेपथ्य, समीर रामटेके यांनी रंगभूषा, शुभम बनसोडे यानी वेशभूषा, धीरज वाटे यांनी संगीत तर निखिल वाटे, चेतन मारबते व स्वप्नील बोरकर यांनी निर्मिती व्यवस्थेची जबाबदारी सांभाळली.
दुपारच्या सत्रात संजय जीवने दिग्दर्शित ‘ढॅन टडँग, टॅन नॅनँग’ हे नाटक सादर करण्यात आले तर वीरेंद्र गणवीर लिखित ‘पाऊस’ हे नाटक ऐनवेळी रद्द करण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा