२० तारखेला मतदानाला जाण्यासाठी धीर गोळा करतो आहे!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेली ४ दशकं राजकारण जवळून पाहणाऱ्या पण आजच्या इतकी हतबुद्धता कधीही न आलेल्या मनाला समजावतो आहे!

शकलं करून टाकलेल्या राजकारणानं भांबावलो आहे. आणि त्यात रयतेची खांडोळी होण्याच्या शक्यतांनी हादरलो आहे!\

राजकारणाचं जे झालंय, केलं गेलंय; त्याला त्यांच्याइतकेच जनता म्हणून आपणही जबाबदार आहोत याची खूप खंत आहे. आणि सार्वजनिक अधमतेची जी पातळी आपण सगळ्यांनी मिळून गाठली आहे, गाठू दिली आहे; त्याचं अतीव दु:ख आहे!

आपली सामूहिक असाहाय्यता पाहून होणारी तडफड आहे!

नेत्यांच्या वक्तव्यांची नीचतम पातळी बघून वाटणारं आश्चर्य आहे. आणि ती वक्तव्यं आधी जिभल्या चाटत पचवणाऱ्या आणि मग उलटी काढून ती पसरवणाऱ्या आपल्या सगळ्यांची वाटणारी कीव आहे!

माझा डेटा चोरून, माझी परवानगी न घेता, ‘एआय’ चा वापर करून, चक्क माझं नाव घेत मला रेकॅार्डेड कॉल करून माझं मत मागणाऱ्या व्यवस्थेबद्दल संताप आहे. आणि मतदार म्हणून असलेलं स्वातंत्र्य गहाण टाकून एखाद्या व्यवस्थेच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आमची चीड पण आहे!

निकाल कसे लागतील याचं कुतूहल आहे. पण दिलेला ‘कौल’ किती दिवस ‘दिला होता तिथेच’ राहील याचा संभ्रम आहे!

चाळिसातली बहुतेक वर्षं मतदान केंद्राकडे पावलं आपसूक वळत होती याचा आनंद आहे. पण आता त्यांना फरफटत न्यावं लागतानाचा आक्रोश काळजाला रक्तबंबाळ करतो आहे !

पण चला,

मलमपट्टी करायला हवी.

बोटाला शाई दाखवायला हवी.

वेडी आशा शहाणी करायला हवी!

-अतुल कुलकर्णी

atul@atulkulkarni. com

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 marathi actor atul kulkarni message through poem ahead of voting css