सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती. आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरु झालं आहे. या कार्यक्रमामधील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. या कलाकारांमधील असाच एक कलाकार म्हणजे गौरव मोरे. गौरव अगदी सामान्य कुटुंबातील मुलगा. तो अगदी मेहनत करत इथवर पोहोचला. त्याच्या चाहतावर्गामध्येही प्रचंड वाढ झाली आहे. गौरवने असाच एक व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.
आणखी वाचा – “अजूनही फिल्टर पाड्यातील चाळीतच राहतो कारण…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेचं कसं आहे खरं आयुष्य?
गौरव प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात नेहमीच यशस्वी ठरतो. त्याच्या विनोदाचा अचूक टायमिंग तर कमालीचा आहे. फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. अशा सतत हसतमुख असलेल्या गौरवला जेव्हा त्याची चाहती भेटते तेव्हा नेमकं काय घडतं? हे गौरवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
पाहा व्हिडीओ
एका कार्यक्रमासाठी गौरवने हजेरी लावली होती. तिथे त्याला भेटण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. गौरव व्हॅनिटी व्हॅनमध्ये आला असता एक मुलगी तिथे त्याला भेटायला आली. यावेळी तिने त्याच्याबरोबर सेल्फी काढला. तसेच गौरवचं कौतुक केलं. पण यादरम्यान गौरवला पाहताच ती रडू लागली. चाहतीचं प्रेम पाहून गौरवने तिला मिठी मारली आणि ते प्रेम पाहून तो देखील भारावून गेला.
गौरवने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “तुम्ही आम्हाला खूप प्रेम दिलं आहे. अशावेळी काय बोलावं तेच कळत नाही.” गौरवचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. तसेच त्याच्या चाहत्यांनी कमेंट्सच्या माध्यमातून गौरव आम्हालाही तू खूप आवडतोस असं म्हटलं आहे. चाहत्यांचं मिळत असलेलं प्रेम पाहून गौरव देखील आनंदी झाला आहे.