छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चं नवं पर्व नुकतंच सुरू झालं. परदेशवारीनंतर हास्यजत्रेतील अवलीय कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचं काम करत आहेत. आता हास्यजत्रेतील कलाकारांचं नवं नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. यासंदर्भात कलाकारांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांच्या नव्या नाटकाचं नावं ‘थेट तुमच्या घरातून’ असं आहे. या नव्या नाटकात अभिनेता प्रसाद खांडेकर, शिवाली परब, ओंकार राऊत, भक्ती देसाई, प्रथमेश शिवलकर आणि नम्रता संभेराव पाहायला मिळणार आहेत. ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकाच्या लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीची धुरा प्रसाद खांडेकर सांभाळणार आहे. तसंच महत्त्वाचं म्हणजे या नाटकाच्या माध्यमातून शिवाली परब मराठी नाट्यसृष्टीत पाऊल ठेवत आहे. २१ डिसेंबरपासून हे नवं नाटक पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीच्या बहिणीचं ठरलं लग्न, आनंदाची बातमी देत म्हणाली…
‘थेट तुमच्या घरातून’ या नव्या नाटकासंदर्भात प्रसाद खांडेकर पोस्ट करत म्हणाला, “प्रजाकार – Author of creation…नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आतापर्यंत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रचंड प्रमाणात आशीर्वाद दिलात. माझ्या प्रत्येक कलाकृतीवर भरभरून प्रेम केलंत. मग ती एकांकिका असो ते नाटक असो, सिनेमा असो किंव्हा ते स्किट असो. आता याच तुमच्या प्रेमाच्या विश्वासावर निर्माता म्हणून उभा राहतोय बरोबर सचिन कदम हा माझा मित्र आहेच.”
पुढे प्रसाद खांडेकरने लिहिलं की, प्रजाकार या माझ्या नवीन निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सोहम प्रॉडक्शन आणि गोट्या सावंत यांच्या व्ही आर प्रॉडक्शनच्या मदतीने ‘थेट तुमच्या घरातून’ या माझ्या नवीन नाटकाची निर्मिती करतोय. लेखन, दिग्दर्शन माझंच आहे आणि बरोबर नम्रता संभेराव , ओंकार राऊत , शिवाली परब , प्रथमेश शिवलकर , भक्ती देसाई ही मित्रमंडळी पण नाटकांत आहेत. २१ डिसेंम्बरला शुभारंभ आहे. विश्वास आहे आतापर्यंत जसं प्रत्येक कलाकृतीवर प्रेम केलंत तसं या प्रयत्नाला सुद्धा पाठिंबा द्याल आणि प्रचंड प्रेम द्याल कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.
हेही वाचा – स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…
तसंच नम्रता संभरावने पोस्ट करत लिहिलं, “गणपती बाप्पा मोरया…नाटक प्रेम आहे, श्वास आहे, जीव आहे सांगण्यास अत्यानंद होतोय की आपल्या नवीन नाटकाचा श्री गणेशा होतोय. या महिन्यापासून रंगमंचावर पुन्हा एकदा रुजू होणार आहोत. रंगमंच, हाऊसफुलच्या पाट्या, प्रेक्षकांच्या टाळ्या, अतोनात प्रेम आणि तुमची उपस्थिती यांची आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. एक नवा कोरा नाट्यानुभव, आपल्या जवळच्या नाट्यगृहात नक्की या. आता आपली थेटभेट होईल प्रेक्षागृहात.’
अभिनेत्री शिवाली परबने देखील सोशल मीडियावर आपल्या पहिल्या वहिल्या नाटकासंदर्भात खास पोस्ट शेअर केली आहे. तिने नाटकांचं पोस्टर शेअर करत लिहिलं, “माझं रंगभूमीवरचं पहिलं नाटक. खूप भीती खूप उत्सुकता आणि खूप आनंद अश्या बऱ्याच भावना एकत्र आहेत. मायबाप रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद असेच राहूदेत हिच इच्छा.”
दरम्यान, ‘थेट तुमच्या घरात’ या नव्या नाटकाचा शुभारंभ प्रयोग २१ डिसेंबर पनवेल मधील फडके नाट्यगृह येथे असणार आहे. त्यानंतर अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे असणार आहे.