झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळा हा प्रेक्षकांसाठी नेहमीच खास असतो. या कॉमेडी अॅवार्ड सोहळ्याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळते. यंदाच्या या कॉमेडी अॅवार्ड सोहळ्यात अभिनेत्री विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळी यांच्या एका नाटकाला नामांकन मिळाले आहे. ‘कुर्रर्र’ असे नाटकाचे नाव आहे. मातृत्वाच्या संवेदनशील विषयावर हे नाटक आधारित आहे. या नाटकाची सध्या घराघरात चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे.
आईपण हे महान आहेच, पण हे सुख अनुभवण्यासाठी थोडा वेळ लागत असेल तर तो प्रवासही त्या आई होणाऱ्या स्त्रीसाठी सुखद असायला हवा, हलकाफुलका असायला हवा. आई होण्याच्या याच संवेदनशील भावनेला विनोदाच्या गोडव्यातून ‘कुर्रर्र’ हे नाटक रंगमंचावर आलं. विनोदाची भट्टी असलेल्या प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव आणि पंढरीनाथ कांबळे या भन्नाट टीमने ‘कुर्रर्र’ या नाटकाची निर्मिती केली आहे. झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या नामांकनांमध्ये ‘कुर्रर्र’ नाटकाचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट नाटक या विभागामध्ये ‘कुर्रर्र’ नाटकाला नामांकन मिळालं आहे.
हेही वाचा >> “मी सलमान खानकडून…”, ‘बिग बॉस’ शोचे सूत्रसंचालन करण्याबाबत नागार्जुन यांचा खुलासा
कुर्रर्रर्र हा शब्द माणसाच्या कानात त्याला आयुष्यात एकदाच ऐकायला मिळतो. आई या शब्दाशिवाय दुसऱ्या कुणीतरी बाळाच्या कानात म्हटला जाणारा हा पहिला शब्द. बाळासाठी आणि त्याच्या आईसाठी कुर्रर्र हा शब्द घुमतो तो पाळण्यात. जन्मानंतर बाराव्या दिवशी. जिला आई व्हायची इच्छा आहे तिच्यासाठी तर हा शब्द लग्न झाल्यापासूनच मनात रूंजी घालत असतो. आजही लग्नानंतर मातृत्वाची चाहूल कधी लागतेय हा प्रश्न परवलीचा बनलेला असतो. ज्या महिला आई होऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या आई होण्यात काही अडथळे येत असतील त्यांना आजही समाजाकडूनच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांकडूनही टोमणे ऐकून घ्यावे लागतात. याच संवेदनशील विषयावर कुर्रर्र नाटक हलक्या फुलक्या पद्धतीने भाष्य करताना पाहायला मिळते.
हेही पाहा >> Photos : ‘फॅमिली अस्र’, आलिया-रणबीरने घेतली बॉडीगार्डच्या कुटुंबियांची भेट, पाहा फोटो
येत्या ९ ऑक्टोबरला झी टॉकीज या वाहिनीवर दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळा प्रसारित केला जाणार आहे. सर्वोत्कृष्ट नाटक या विभागात नामांकन मिळालेल्या कुर्रर्र नाटकाला झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड मिळणार का? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. या सोहळ्यात या नाटकाला पुरस्कार मिळतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.