‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. या कार्यक्रमाने काही दिवसांसाठी ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा एका नव्या अंदाजामध्ये आजपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या कार्यक्रमामधील सगळ्यांचाच लाडका कलाकार समीर चौगुलेची यानिमित्त भेट झाली. लोकसत्ता ऑनलाईनशी संवाद साधताना त्याने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या भेटीदरम्यानचा किस्सा सांगितला.
आणखी वाचा – आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’चे शो रद्द, जबरदस्त प्रमोशन, अधिक मेहनत करूनही सुपरफ्लॉप ठरला चित्रपट
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकार मंडळी काही महिन्यांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर बिग बी अमिताभ बच्चन यांना भेटायला गेले होते. यावेळी या कार्यक्रमाचं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. इतकंच नव्हे तर समीरच्या पाया पडण्यासाठी ते खाली वाकले. यादरम्यान त्याला नेमकं काय वाटलं? हे समीरने सांगितलं आहे.
पाहा व्हिडीओ
समीर म्हणाला, “मी अपेक्षाही केली नव्हती असं त्यादिवशी घडलं. ज्या व्यक्तीकडे आपण अभिनयाचा पर्वत म्हणून बघतो ती व्यक्ती असं काही करेल असं मला वाटलंच नाही. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’वर अमिताभ बच्चन सरांचं भयंकर प्रेम आहे हे ऐकून मला खूप आनंद झाला. नियमित हा कार्यक्रम ते बघतात.”
“२२ मिनिटं बच्चन सर फक्त आमच्याबद्दलच बोलत होते. मी त्यांना सांगितलं की मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मला तुमच्या पाया पडायचं आहे. त्यावर बच्चन सर म्हणाले, नाही नाही मी तुझं काय करु? मलाच तुझ्या पाया पडायचं आहे. असं म्हणत ते अक्षरशः पाया पडण्यासाठी खाली वाकले. त्याक्षणी माझ्या डोळ्यात पाणीच आलं. तो क्षण मी आयुष्यात विसरु शकणार नाही. हा क्षण मला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रे’ने दिला.” अमिताभ बच्चन यांची भेट समीरसाठी एका स्वप्नासारखीच होती.