‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गाजवणारी अभिनेत्री नम्रता संभेराव सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. ती सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवताना दिसते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळेच तिला अधिक लोकप्रियता मिळाली. तिच्या विनोदी शैलीचे हजारो चाहते आहेत. एक कलाकार म्हणून नम्रता उत्तम आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नव्या पर्वातही ती तितकीच धमाल करते. चक्क अभिनेते जॉनी लिवर तिचे फॅन आहेत.
आणखी वाचा – Video : ‘देवमाणूस ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार? किरण गायकवाडच्या नव्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
नम्रता खऱ्या आयुष्यात एक पत्नी, मुलगी, आई आणि मैत्रीण म्हणून उत्तम भूमिका निभावते. पण सगळ्या जबाबादाऱ्या सांभाळत असताना आपल्या कामाबाबत ती एकनिष्ठ आहे. याचंच फळ म्हणून की काय नम्रताने एका कार्यक्रमादरम्यान एक सुंदर किस्सा सांगितला. सोनी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे.
नम्रताने म्हटलं की, “प्रसाद खांडेकर आणि माझा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये मी, हे गुघ्यांनो धन्यवाद वगैरे म्हटलं होतं. हा व्हायरल व्हिडीओ जॉनी लिवर यांच्यापर्यंत पोहोचला. व्हिडीओ पाहून त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. माझं खूप कौतुक केलं. तो क्षण माझ्यासाठी सुखद धक्का होता. कॉमेडीचा बादशाह, ज्यांनी बॉलिवूड गाजवलं त्यांनी मला फोन करत माझं कौतुक केलं यापेक्षा मोठी कोणतीच गोष्ट नाही.”
जॉनी लिवर यांचा फोन येताच नम्रता अगदी भारावून गेली होती. तिच्यासाठी हा क्षण आयुष्यभर लक्षात राहणारा आहे. शिवाय तिच्या कामाची ही पोचपावतीच आहे. नम्रता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये साकारत असलेले पात्र अगदी लोकप्रिय आणि चर्चेचा विषय ठरतात. ती साकारत असलेलं लॉली हे पात्र तर प्रेक्षकांना खळखळून हसवतं.