‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे महाराष्ट्रभरात लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमामध्ये काम करणारा प्रत्येक अभिनेता अगदी प्रत्येकाला खळखळून हसवतो. त्यातीलच एक अभिनेता म्हणजे निखिल बने. निखिल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. अगदी सामान्य कुटुंबातील हा मुलगा आजही चाळीतील घरात राहतो. त्याने त्याच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Photos : सिद्धार्थ जाधवची कुटुंबाबरोबर दुबई ट्रिप, महागड्या गाडीची सफर अन् बरंच काही

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे निखिल नावारुपाला आला. या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीस आलेला निखिल भांडूपमधील एका चाळीमध्ये राहतो. त्याने त्याच्या याच घराचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला आहे. निखिलने त्याच्या घराची आता सुधारणा केली आहे. पण त्यापूर्वी आपलं घर कसं होतं आणि आता कसं आहे हे त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं आहे.

“जुन्या जागेत आत्मा असतो. त्यामुळे ती जागा सोडण्यापेक्षा अधिक चांगली करण्यात खरी मज्जा आहे.” असं निखिलने व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे. तसेच घर नव्या पद्धतीने उभारण्यासाठी चाळीतल्या लोकांची त्याला बरीच मदत मिळाली. यादरम्यानचा देखील त्याने एक व्हिडीओ शेअर केला. “चाळीत एकत्र राहण्याची हिच खरी मज्जा आहे. सुख असो, दुःख असो किंवा काहीही मदत असो सगळे धावून येतात.” अशा शब्दांमध्ये निखिलने आपल्या चाळीतल्या मंडळींचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा – “कर्करोगाने गाठलं अन् चौथ्या दिवशीच…” मरणाच्या दारातून परतली सोनाली बेंद्रे, सांगितला संपूर्ण प्रवास

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेपासून निखिलच्या अभिनयक्षेत्राला सुरुवात झाली. त्याने पडद्यामागेही बरंच काम केलं आहे. कलाक्षेत्रात मेहनत करत असतानाच त्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमासाठी विचारण्यात आलं. या कार्यक्रमामुळे त्याने आज स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajtra show actor nikhil bane share his home video on instagram viral on social media kmd