महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्हात असलेल्या नांदोस या गावात बॉलीवूड (फिल्म सिटी) उभारण्यात येत आहे. बॉलीवूडकरांचे हे नवे चित्रीकरण स्थळ असणार आहे. ही चित्रनगरी येत्या चार वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा असून, त्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आलेली आहे. चित्रीकरण आणि पर्यटन स्थळ असा या ठिकाणाचा दुहेरी उपयोग केला जाणार आहे.
साई बॉलिवूड फिल्मसिटी इंडिया प्रा. लि., महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि परदेशी गुंतवणूकदार या प्रकल्पाकरिता एकत्र आले आहेत. सिंधुदुर्गच्या नांदोस गावात ३०५ एकर क्षेत्रावर हा प्रकल्प साकारणार आहे. यामध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे ‘हॉलिवूड हिल’प्रमाणे एका मोठ्या टेकडीवर ‘बॉलिवूड’ असे अक्षर कोरण्यात येईल. कंपनीने थेट परकी गुंतवणूकीद्वारे विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे, तर हिंदी चित्रपट क्षेत्रातील मातब्बर अशी मोशन पिक्चर डिस्ट्रिब्युटर असोसिएशन (भारत) प्रा. लि. ही कंपनीही या प्रकल्पामध्ये सहभागी झाली आहे, असे साई बॉलीवूड फिल्मसिटी इंडिया प्रा.लि. व्यवस्थापकीय संचालक कमल कौशिक म्हणाले.
कंपनीचे संचालक सुनील वर्मा म्हणाले की, या प्रकल्पासाठी पर्यटन विकास महामंडळाने दहा वर्षांसाठी विविध करांमध्ये सवलत देऊ केली असून यात वीज बिलाचाही समावेश आहे. हा पूर्ण प्रकल्प तीन टप्प्यात पूर्ण केला जाईल. या प्रकल्पामुळे महाराष्ट्र आणि गोव्यातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. गोव्यापासून हे ठिकाण केवळ तीस किलोमीटर अंतरावर आहे. भारतासाठी ही पूर्णपणे वेगळी संकल्पना आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेले पेटन्ट्स आणि कॉपिराइट्स आम्ही खरेदी केले आहेत. त्यामुले हा प्रकल्प बॉलीवूडसाठी ‘रिअल डेस्टीनेशन’ असेल, असे वर्मा म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा