ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांनी लिहिलेल्या ‘म्हादू’ या लघुकथेवर याच नावाचा मराठी चित्रपट तयार झाला आहे. गेली काही वर्षे वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम करणारे आणि ‘पुणेरी ब्राह्मण’, ‘तमाशा- एक रांगडी कला’, ‘वारी- एक आनंदयात्रा’, ‘असाही एक महाराष्ट्र’ या छाया-शब्द पुस्तकांनी आपली वेगळी ओळख निर्माण करणारे संदेश भंडारे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
भारतात ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी इंग्रजांकडून तर आता आपल्या राज्यकर्त्यांकडून ते काम सुरू आहे. विकासाच्या नावाखाली प्रत्येक वेळी भूमीपुत्रांचा बळी दिला जात आहे. ‘म्हादू’ची कथा ही आदिवासी विरुद्ध शहरवासी अशी नसून ती ‘भूक’ आणि ‘हव्यास’, अशी असल्याचे भंडारे यांनी सांगितले. सुरुवातीला मित्रांकडून पैसे गोळा करून चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली. नंतर आरती किर्लोस्कर यांनी पाच लाख रुपयांची देणगी देऊन हुरूप वाढविला तर परिमल चौधरी यांनी निर्मितीचा मोठा आर्थिक भार पेलला. चित्रपटात थ्रीडी इफेक्ट आणि अॅनिमेशनचा काही भाग असून ते चित्रपटाचे खास वैशिष्टय़ आहे. चित्रपटात पाच गाणी असून प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रईस खान यांचे शिष्य स्वानंद राजाराम यांनी संगीतबद्ध केली आहेत. ही गाणी विविध शास्त्रीय रागांत बांधण्यात आली असल्याचेही भंडारे म्हणाले.
आदिवासींचे कुपोषण आणि पर्यावरण जतन व संरक्षण या महत्त्वाच्या विषयाचा चित्रपटात वेध घेण्यात आला आहे. चित्रपटातील ‘म्हादू’ या आदिवासीची भूक ही फक्त पोटाची नसून आर्थिक, शिक्षण आणि नागरिक म्हणून शासनाकडून मिळणाऱ्या अधिकाराचीही असल्याचे भंडारे यांनी नमूद केले. या चित्रपटात अमोल धोंगडे, सारंग साठय़े, कैलास वाघमारे, राजकुमार तागडे, वीणा जामकर, अतुल पेठे आदी कलाकार आहेत. चित्रपटाचे पटकथा-लेखन आणि दिग्दर्शनही भंडारे यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा